नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
भरपाई रक्कम वाचवण्यासाठी झाडांची अवैध कत्तल?
वाशी : नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाने झाडे तोडणे, स्थलांतर प्रस्तावातील बाधित झाडांची भरपाई वृक्ष लागवड रक्कम म्हणून झाडाच्या वयाप्रमाणे प्रतिवर्ष दहा हजार रुपये केली आहे. त्यामुळे भरपाई रक्कम वाचावी आणि झाडांची संख्या कमी राहावी, याकरिता काही विकासकांमार्फत त्यांच्या भूखंडावर अवैध वृक्षतोड केली जात असून, नेरुळ (पूर्व) भागात भरपाई रक्कम वाचवण्यासाठी झाडांची अवैध कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र नागरी क्षेत्र जतन झाडांचे अधिनियम १९७५ मधील सुधारीत अधिनियम २०२१ नुसार आता वृक्षतोड, स्थलांतर प्रस्तावात बाधित झाडांचे वय काढून या वयाच्या संख्येइतकी भरपाई वृक्ष लागवड अर्जदाराला करावी लागते. तसेच लागवड केलेल्या झाडांचे सात वर्ष संगोपन करावे लागते. याशिवाय प्रतिवृक्ष पाच हजार रुपये अमानत रक्कम भरावी लागते. मात्र, वृक्ष लागवड करण्यास जागा उपलब्ध नसेल तर प्रती वृक्ष दहा हजार रुपये ‘ना परतावा रक्कम' नवी मुंबई महापालिका उद्यान विभागात भरावी लागते. सदर रक्कम वाचावी म्हणून काही विकासक विना परवानगी झाडे तोडून किमान झाडांच्या परवानगी साठी अर्ज करतात. नुकताच असा एक प्रकार नेरुळ (पूर्व) भागात समोर आला आहे. या ठिकाणी गेल्या मे महिन्यात तीन ते चार झाडांची कत्तल करण्यात आली असून, भुखंड धारकाने आता पाच झाडे तोडण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, सदर प्रकाराची माहिती महापालिका नेरुळ विभाग कार्यालयात देऊन देखील कुठलीच कार्यवाही होताना दिसत नसल्याने अवैध वृक्ष तोडीला महापालिका अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न या निमित्ताने वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
------------------------------------
अवैध वृक्ष तोड प्रकरणी सदर भुखंडावर स्थळ पाहणी करुन पंचनामा करण्याच्या सूचना उद्यान अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सदर पंचनामा अहवाल आल्यानंतर पुढील उचित कार्यवाही केली जाणार आहे. - डॉ. अमोल पालवे, सहाय्यक आयुक्त तथा नेरुळ विभाग अधिकारी - नवी मुंबई महापालिका.