नारळी पौर्णिमा सणासाठी कोळीवाड्यांमध्ये लगबग सुरु

वाशी : ‘देवाची किरपा आम्हावर, कोळ्यांना पोसतोय समिंदर'...त्यामुळे वर्षभर आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या समुद्राला श्रावण पौर्णिमा दिनी आगरी-कोळी लोक नारळ  अर्पण करुन समुद्राच्या उपकाराचे आभार मानतात. यंदा देखील नारळी पौर्णिमा सणानिमित्त नवी मुंबई शहरातील कोळीवाडे सज्ज झाले असून, मागील दोन महिने उभ्या असलेल्या होड्याची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात आगरी-कोळी लोक मग्न झाले आहेत.

येत्या १९ ऑगस्ट रोजी साजरा  होणाऱ्या नारळी पौर्णिमा निमित्त नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे, दिवा, वाशी, सारसोळे, घणसोली, बेलापूरमधील दिवाळे येथील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची लगबग दिसत आहे. नारळी पौर्णिमा सणाला अद्याप ६ दिवस शिल्लक असले तरी आतापासूनच या सणाची धामधूम पाहायला मिळत आहे. नारळी पौर्णिमा सणानिमित्त आगरी-कोळी महिलांसह बच्चे कंपनी घराघरांमध्ये सजावट करताना दिसत आहेत. दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासकीय बंदी असल्याने कोळी लोकांनी समुद्र किनारी नांगरुन ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी  केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. नारळी पौर्णिमा सणाला याच होड्या सजवल्या जातात.तर नैवद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करतात. एकूणच  नारळी पौर्णिमा सणानिमित्त कोळीवाड्यातील उत्साह शिगेला पोहोचतो. काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येतात. दर्याराजाला नारळ अर्पण करुन ‘मासळीचा दुष्काळ सरु दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे', अशी मागणी कोळी लोक करतात. त्यानंतर ‘सण आयलाय गो,  आयलाय गो नारळी पूनवेचा', अशी गाणी गात समुद्रकिनाऱ्यावर नाचगाणी यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला जातो. सजवलेल्या बोटी समुद्रात ढकलून सागरप्रवासाचा मुहूर्त केला जातो. यंदा देखील नारळी पौर्णिमा निमित्त कोळीवाडे सजले असून, होड्या पाण्यात सोडण्यासाठी  तयार आहेत,अशी माहिती ‘कोलवाणी मित्र मंडळ'चे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.

नारळी पौर्णिमा सणानिमित्त खास अशा एकाच रंगाच्या साड्या त्याही नऊवारी साडी नेसण्याकडे तरुणींचा कल सध्या वाढू लागला आहे. स्पेशल होड्यांची प्रतिकृती असणाऱ्या फुलांच्या वेण्यांना देखील मागणी वाढली असून, फुलांच्या वेण्यांची क्रेझ देखील वाढू लागली आहे. याशिवाय तरुण पिढी देखील पारंपरिक पोशाखाला पसंती देऊ लागली आहे.बँड पथक देखील सज्ज झाले आहेत.

नारळी पौर्णिमा सणाचे महत्व
संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतो. त्यावेळी कोळी महिलांची मदार सागरदेवावर असते. त्यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीने नारळी पौर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा (पूर्ण्या) यांचा नैवद्य बोटीला आणि समुद्राला दाखवून समुद्राची यशासांग पूजा केली जाते. ‘खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे', असे साकडे कोळी भगिनी समुद्राला घालतात.

समाज माध्यमांवर ‘रिल्स'ची धूम
यंदा १९ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा सण आहे. मात्र, या सणाची खरी लगबग समाज माध्यमांवर आठ ते दहा दिवस आधीपासूनच सुरु झाली आहे. आगरी-कोळी महिला, तरुणींनी आगामी नारळी पौर्णिमा सणाला अनुसरुन कोळी गाण्यांचा ठेका धरत मोठ्या  प्रमाणात फोटो, व्हिडिओ रिल्स  प्रसारित केल्या आहेत.त्यामुळे समाज माध्यमांवर या रिल्सची धूम पाहवयास मिळत असून, या सणाबाबतची उत्सुकता  शिगेला पोहोचली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 भरपाई रक्कम वाचवण्यासाठी झाडांची अवैध कत्तल?