नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘बीएमटीसी कर्मचारी पुनर्वसन समिती'चे एकदिवसीय धरणे आंदोलन
उरण : प्रकल्पग्रस्त शेतकरी, बीएमटीसी मिठागर, भूमीहीन अशा अन्याय झालेल्या कामगार वर्गास देशोधडीला लावणाऱ्या सिडको प्रशासन विरोधात ९ ऑगस्ट २०२४ रोजी अर्थात क्रांती दिनी कामगार नेत्या डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो कामगारांनी सिडको भवन समोर एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन केले. या आंदोलनात कामगार, शेतकरी, मिठागर असे शेकडो प्रकल्पग्रस्त तसेच बीएमटीसी कामगार, कर्मचारी पुनर्वसन समिती सदस्य, अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, १९८७ च्या रक्तरंजित लढ्याची पुनरावृत्ती करायला लावू नका, असा इशारा कामगार नेत्या डॉ. श्रुती म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सिडको व्यवस्थापनाला दिला.
संघर्षाचा जोरदार विरोध बघून ‘सिडको'कडून आश्वासनाचे पत्र...
या आंदोलनाची दखल घेऊन सिडको व्यवस्थापनाने कामगार नेत्या डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. यावेळी डॉ. श्रुती म्हात्रे यांनी मागण्यांचे निवेदन सिडको व्यवस्थापनाला दिले. यानंतर ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक आणि संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यात बैठकीत अंती विशेष हरकतींसह प्रस्ताव बनवन त्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मंत्रालयात बैठक निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार बीएमटीसीच्या माजी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी प्रधान सचिव (नवि-१) यांच्या अध्यक्षतेखाली १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांचे मंत्रालयीन दालन, मुख्य इमारत, चौथा मजला, मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, सिडको व्यवस्थापनाकडून बैठकीसंदर्भात लेखी कळविण्यात आल्याने ‘बस सेवा कर्मचारी पुनर्वसन समिती'च्या (बीएमटीसी) अध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील बीएमटीसी कामगारांच्या शिष्टमंडळाने पुकारलेल लाक्षणिक धरणे आंदोलन तूर्तास काही दिवसांसाठी मागे घेत असल्याचे जाहीर केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘पनवेल शहर जिल्हा काँग्रेस'चे अध्यक्ष सुदाम पाटील, ‘दि. बा. पाटील २७ गांव प्रकल्प बाधित कृती समिती'चे अध्यक्ष तथा ‘काँग्रेस'चे तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, अजित म्हात्रे, देविदास थळी, दीपक म्हात्रे, बबन कांबळे यांच्यासह कामगार क्षेत्रातील मान्यवर आणि ‘समिती'चे पदाधिकारी-सदस्य उपस्थित होते.