‘दिबां'च्या जयंती दिनी जासई येथे चळवळ स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा

उरण : नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आयोजित  दि. बा. पाटील स्फूर्तिस्थान या चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणातील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ आणि या चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांमधील समर्पित शिक्षकांचा सन्मान सोहळा १३ जानेवारी रोजी ‘दिबां'च्या जयंती दिनी त्यांच्या जन्मभूमीत म्हणजेच उरण तालुक्यातील जासई येथील मंगल कार्यालय हॉल मध्ये सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

यावेळी सदर चळवळ स्पर्धेत दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या प्रकारातील गुणवंत विजेत्यांना तसेच दि. बा. पाटील यांच्या कार्याची आणि विचारांची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या समर्पित शिक्षक यांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. या गौरव सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीे'चे अध्यक्ष दशरथ पाटील, शेकाप नेते जे. एम. म्हात्रे,
‘काँग्रेस'चे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, ‘दिबां'चे सुपुत्र अतुल पाटील, शेकाप नेत्या सीमाताई घरत, ‘जासई'चे सरपंच संतोष घरत, उपसरपंच माई पाटील आदि उपस्थित राहणार आहेत, असे ‘चळवळ स्पर्धा'चे आयोजक तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी सांगितले.

सदर सोहळ्याचे नियोजन जासई गांव ग्रामस्थ आणि वाशीगांव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून जासई ग्रामस्थ सुरेश पाटील, विनोद म्हात्रे या सोहळ्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

दरम्यान, या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी नुकतेच जासई गांव ग्रामस्थ आणि ‘नवी मुंबई पुनर्वसन संस्था'च्या संयोजन समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल-लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज हॉल मध्ये घेण्यात आली.

नवी मुंबईतील तसेच देशातील निवासी आणि मूळ निवासी नागरिक यांचे मूलभूत हक्क आरक्षित आणि सुरक्षित रहावेत यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी देशातील सर्व धर्मियांसाठी त्याग आणि संघर्ष करुन दिलेला विचार आंदोलनाच्या स्वरुपात सतत तेवत रहावा म्हणून आयोजित सदर चळवळरुपी स्पर्धेतून प्राप्त कला आणि साहित्याच्या रुपाने प्रज्वलित रहावा, या उद्दिष्टाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. - दशरथ भगत, आयोजक -दि. बा.चळवळ स्पर्धा.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न राबवणार कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार देणार : देवेंद्र फडणवीस