नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या ६ जिल्हांचे संघ स्पर्धेत सहभागी

कोंकण परिक्षेत्रिय पोलीस कीडा स्पर्धेत रायगडच्या संघाने पटकविले सर्वप्रथम मानाचे सर्वोत्कृष्ट पुरुष जनरल चॅम्पियनशिप   

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या कळंबोली येथील परेड मैदानात भरविण्यात आलेल्या  ४७ व्या कोकण परिक्षेत्रिय पोलीस क्रिडा स्पर्धेत रायगड संघाने विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य दाखवून यावर्षीच्या खेळातील सर्वप्रथम मानाचे सर्वोत्कृष्ट पुरुष जनरल चॅम्पियनशिप पटकविले. तर नवी मुंबई महिला संघाने सर्वप्रथम मानाचे सर्वोकृष्ट महिला जनरल चॅम्पियनशिप पटकावले आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.

नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या कळंबोली येथील परेड मैदानात ९ ते १४ डिसेम्बर या कालावधीत ४७ वी कोंकण परिक्षेत्रिय पोलीस क्रिडा स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोंकण परिक्षेत्रातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या ६ जिल्हांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला असे एकुण ८३५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये रायगड संघाने रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य दाखवून यावर्षीच्या खेळातील सर्वप्रथम मानाचे सर्वोत्कृष्ट पुरुष जनरल चॅम्पियनशिप पटकविले. तसेच नवी मुंबई महिला संघाने पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्राविण्य दाखवून यावर्षीच्या खेळातील सर्वप्रथम मानाचे सर्वोकृष्ट महिला जनरल चॅम्पियनशिप पटकाविली आहे.

या पोलीस कीडा स्पर्धेत रायगड पुरुष संघाने हॉकी, फुटबॉल, बॉस्केटबॉल, खो-खो, हॉलीबॉल, कबड्डी, थलेटिक्स, क्रॉस कंट्री, तायक्वोंदो व स्विमींग या खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर नवी मुंबई संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, तायक्वोंदो, ज्युदो, वेट लिफ्टींग, वु-शू या क्रीडा प्रकारात नवी मुंबई महिला संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर ४ बाय ४०० मी. रिले (पुरुष / महिला) क्रीडा प्रकारात रायगड व रत्नागिरी या संघानी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

कोंकण परिक्षेत्रिय पोलीस क्रिडा स्पर्धेचा समारोप कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानात बुधवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक रतनकुमार सिंन्हा, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह,  सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार उपस्थितीत होते. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील  विजेत्या खेळाडूंना बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

४७ व्या कोंकण परिक्षेत्रिय पोलीस क्रिडा स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडू (पुरुष) म्हणून सिंधुदुर्ग येथील राहुल काळे व सर्वोकृष्ट खेळाडू (महिला) म्हणून रत्नागिरीच्या शितल पिंपळे यांना गौरविण्यात आले आहे. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी कर्जत आणि खालापूर तालुक्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी