ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस
वाशी : वाशी मधील क्लाऊड नाईन रुग्णालयाने अग्निशमन नियमांना बगल देत अंतर्गत भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सदरचे अतिक्रमण हटवण्याची मागणी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष'च्या वतीने करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेऊन महापालिकेने या रुग्णालयाला नोटीस बजावली आहे.
वाशी येथील पामबीच गॅलेरीया मॉल मध्ये क्लाऊड नाईन रुग्णालय असून या रुग्णालयाने मॉल मधेच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित रुग्णालय प्रसुती केंद्र आणि लहान मुलांचे रुग्णालय असून देखील याठिकाणी अग्नी सुरक्षेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात जर कदाचित आग लागण्याची दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात वाशी अग्निशमन केंद्राचे अधिकारी तसेच अग्निशमन विभाग प्रमुख महापालिका अतिरिवत शहर अभियंता शिरीष आरदवाड यांना भेटून ‘राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल'च्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. त्याअनुषंगाने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वलाऊड नाईन रुग्णालयात पाहणी केली असता तेथे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे अग्नी सुरक्षेबाबत त्रुटी आढळून आल्याने या रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेने दिलेल्या नोटीस मध्ये रुग्णालयाने केलेले अतिरिक्त बांधकाम तात्काळ हटवून अग्नी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश रुग्णालयाला देण्यात आले आहेत.
या संदर्भात लवकरच संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल'तर्फे महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष तुषार कचरे यांनी सांगितले. याप्रसंगी ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस'चे बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष अजय सुपेकर, संदीप मोहिते, राम पुजारे, केतन वाळकर, प्रणय भोईर, आदि उपस्थित होते.