नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
सुलेखनकार अच्युत पालव यांना ‘पद्मश्री' पुरस्कार जाहीर
नवी मुंबई : भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये जगप्रसिध्द सुलेखनकार तथा ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे ब्युटीफिकेशन आयकॉन अच्युत पालव यांना ‘पद्मश्रीे' असा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अभिनंदन करीत यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे उपस्थित होते.
सुलेखनकार अच्युत पालव यांना अत्यंत मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे, नवी मुंबई शहराचा नावलौकिक वाढविणारी गोष्ट असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असल्याचे नमूद करीत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईच्या शहर सुशोभिकरणात अच्युत पालव यांनी दिलेल्या मौलिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने राबविलेली चित्रकविताभिंतींची अभिनव संकल्पना अच्युत पालव यांच्या कविता सुलेखनातून यशस्वी झाली होती, त्याचे कौतुक राज्यभरातून झाले. विशेष म्हणजे याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. ‘मराठी भाषा गौरव दिन'चे औचित्य साधून आपल्या सुलेखनातील विद्यार्थ्यांसह ते मागील अनेक वर्ष वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रदर्शनी भागात मराठी सुलेखनाचे प्रदर्शन महापालिकेच्या सहयोगाने आयोजित करीत असतात.
४० हून अधिक वर्षे समर्पित भावनेने सुलेखनासाठी आणि त्यातही मोठी लिपीसाठी अनमोल योगदान देणाऱ्या अच्युत पालव यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाचा पद्मश्री पुरस्काराने यथोचित गौरव होताना आपण ‘नवी मुंबई'चे नागरिक आहोत, याचा अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. एखादी गोष्ट निष्ठापूर्वक करीत राहिलो तर त्यात यश निश्चितपणे मिळते असे स्वानुभवातून मत व्यक्त करीत अच्युत पालव यांनी पद्मश्री पुरस्कारामुळे सुलेखन क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल, नवी दिशा मिळेल असे सांगितले. भारत लिपीप्रधान देश असून विविध लिप्यांमध्ये काम करण्यासारखे भरपूर आहे, त्यातली मिठास पकडली पाहिजे, मग लिप्यांचा वापरातून माणसे जोडली जातील, असे पालव म्हणाले.