नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
शेवा कोळीवाडा ग्रामस्थांची संघर्षाची नवी लढाई
आता न्यायासाठी ३ महिन्यांची प्रतिक्षा
उरण : उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने ४० वर्षांपासून जेएनपीटी (जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट) मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनेल बंद आंदोलन पुकारले होते. गावकऱ्यांनी समुद्रातील पाण्यात उतरुन आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून, त्यांनी आपल्या हक्कांसाठी पुढाकार घेतल संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले.
‘जेएनपीटी'ने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गांव विस्थापित करीत गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले. ४ दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज याठिकाणी जगत आहे. आपल्यावरील अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गांवकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत.
दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या जलवाहतूक, पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी वेस्टिन, पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व रमेश कोळी, नंदकुमार पवार, ॲड. सिध्दार्थ इंगळे, आगरी समाज नेते जयेंद्र खुणे आणि मार्शल कोळी यांनी केले. सदर बैठकीस ‘रायगड'चे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे, एसडीओ पनवेल पवन चंदक तसेच ‘जेएनपीटी'चे अध्यक्ष उन्मेष वाघही उपस्थित होते.
यावेळी मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि अधिकारी आंदोलनकर्त्यांच्या ४० वर्षांच्या संघर्षकथा ऐकून स्तब्ध झाले आणि त्यांनी आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. त्यानंतर ना. सर्बानंद यांनी पुनर्वसन प्रक्रिया ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे शब्द दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
चॅनेल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते , सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन सुरळीत पार पडले आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक वळण मिळाले.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    