एपीएमसी आवारात राजकीय पक्षांची कंटेनर कार्यालये

वाशी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारात अनेक अतिक्रमणांचा विळखा पडला असताना आता बाजार आवारात राजकीय पक्षांची देखील घुसखोरी झाली असून त्यांनी कंटेनर कार्यालये थाटत राजकीय बाजार मांडला आहे. मात्र, या अतिक्रमणांवर कारवाई करताना बाजार समिती तसेच महापालिका हात आखडता घेत असल्याने सदर राजकीय कार्यकर्त्यांची दादागिरी वाढत चालली असल्याचे बोलले जात आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून वाशी मधील ‘कृषी उत्पन्न बाजार समिती'ची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी रोज करोडो रुपये शेतमालाची उलाढाल होत असते. याचाच फायदा घेत बाजार आवारामध्ये काही घटकांनी अतिक्रमणे करुन आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांना वाट काढणे मुश्किल होऊन बसते. याबाबत महापालिका अग्निशमन दलामार्फत वारंवार पत्र देऊन अग्निशामक सुरक्षात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर नोव्हेंबर २०२२ मध्ये लागलेली भीषण आग पसरण्याचे मुख्य कारण येथील अतिक्रमण होते असा ठपका देखील ‘बाजार समिती'ने नेमलेल्या ‘समिती'ने ठेवला होता. मात्र, असा ठपका ठेवून देखील बाजार आवारामधील परिस्थिती जैसे थे वैसेच आहे. यात भरीस भर म्हणून काही राजकीय पक्षांनी अतिक्रमण करुन बाजार आवारात आपली कार्यालये थाटत आपली दुकानदारी सुरु केली आहे. सदर अनधिकृत कार्यालयांवर एपीएमसी, महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने बाजार आवारातील विविध कामांमध्ये हस्तक्षेप करुन राजकीय कार्यकर्त्यांची दादागिरी वाढत चालली असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे.

एपीएमसी बाजार आवार फक्त शेतमाल खरेदी-विक्रीसाठी निगडित असताना काही राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. यासाठी येथील व्यापाऱ्यांकडून वर्गणीही वसूल करतात. मात्र, काही व्यापाऱ्यांची इच्छा  नसताना देखील त्यांना वर्गणी द्यावी लागत असल्याने येथील व्यापारी देखील बेजार झाले असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

भाजीपाला बाजार आवारात कुठल्याही राजकीय पक्षाला रस्त्यात अगर मोकळ्या जागेत कार्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत पुढील कार्यवाहीसाठी महापालिकाकडे पत्रव्यवहार केला आहे.
-मारोती पोबितवार, उपसचिव, भाजीपाला बाजार, एपीएमसी.

बाजार आवारात खाजगी राजकीय कार्यालय सुरु करण्याची परवानगी नसून काही घटकांनी कार्यालये उभी केली आहेत. त्याबाबतचा अहवाल बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे.
-जी. टी. पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी, एपीएमसी.

बाजार आवारातील सर्व अतिक्रमणांची माहिती घेऊन याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-सुरेश मोहाडे, कार्यकारी अभियंता, एपीएमसी.

एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणांची माहिती घेण्याच्या सूचना महापालिका अतिक्रमण विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त होताच अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घेतला जाईल.
-प्रबोधन मवाडे, सहाय्यक आयुक्त, तुर्भे विभाग, नमुंमपा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरपुरक उत्सवासाठी मुर्तीकारांना पूर्ण सहकार्य