नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
चक्रीवादळातील श्री संत रामदास बोट कादंबरी प्रकाशित
नवी मुंबईः नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहातील एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रतिभा सराफ यांच्या हस्ते रंगधनु प्रकाशन प्रकाशित गज आनन म्हात्रेलिखित चक्रीवादळातील श्री संत रामदास बोट या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी विचारमंचावर संत साहित्य अभ्यासक देविदास पोटे, प्रा.अजित मगदुम, प्रा. एल.बी.पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, लेखक गज आनन म्हात्रे, नवरंग मंडळाचे सचिव घनश्याम परकाळे उपस्थित होते.
सत्याहत्तर वर्षापूर्वी समुद्री चक्रीवादळात बुडालेल्या रामदास बोटीवर वाचनीय कादंबरी लिहून गज आनन म्हात्रे यांनी साहित्य क्षेत्रात मोलाची भर टाकली असून या कादंबरीत तत्कालीन लोकजीवन, संस्कृती, भूगोल, ईतिहास सहजतेने आला आहे आणि म्हणून या कादंबरीवर सहज चांगला चित्रपट होईल असे प्रतिपादन यावेळी प्रा.प्रतिभा सराफ यांनी केले. गज आनन म्हात्रे हे अभ्यासपूर्ण लेखनासाठी झपाटलेले लेखक असून या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करण्याचा मनोदय प्रा.अजित मगदुम यांनी व्यक्त केला. म्हात्रे हे भटकंती करून, निसर्ग, लोकजीवन पाहून लेखन करतात, ते आपल्याच मनातले लिहितात असे प्रतिपादन प्रा.एल.बी.पाटील यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी वाचकास खिळवून ठेवण्याची क्षमता म्हात्रे यांच्या लिखाणात असल्याचे मत यावेळी मांडले. हा प्रकाशन कार्यक्रम नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई, ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ, ज्येष्ठ नागरिक संघ ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगळा उदामळे यांनी केले.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    