नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
सखोल स्वच्छता मोहिमांचा सकारात्मक परिणाम
नवी मुंबई : शहर स्वच्छतेप्रमाणेच शहरातील पर्यावरणाकडेही विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार १३ डिसेंबरपासून शहरातील महामार्ग तसेच अंतर्गत मुख्य रस्ते यांच्या सखोल स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला जमा झालेली माती, रेती, गवत, घनकचरा उचलून घेणे तसेच रस्त्यांच्या कडेला असलेली झुडपे व सुकलेले गवत काढून टाकणे त्याचप्रमाणे प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते, पदपथ धुणे आणि हवेमध्ये स्प्रेईंग मशीन द्वारे पाणी मारुन हवेतील धूळ कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. याचा उपयोग शहराच्या हवा गुणवत्ता सुधारणेत झाल्याचे अभिप्राय नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.
या अनुषंगाने सायन-पनवेल महामार्ग तसेच एमआयडीसी क्षेत्रातील मुख्य रस्ते यांचे अधिकार जरी नवी मुंबई महापालिकेकडे नसले तरी तेथील अस्वच्छतेमुळे शहराकडे बघण्याचा त्या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा दृष्टीकोन बदलतो, अशी लक्षात घेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शीळफाट्याकडून महापे नवी मुंबईकडे येणाऱ्या मुख्य मार्गाची शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना दिल्या. सदर ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली माती, काही ठिकाणी डेब्रीजचे ढीग, सुकलेली अस्ताव्यस्त झाडेझुडपे यांची सखोल साफसफाई करण्याचे निर्देश दिले.
शीळ-एमबीआरपासून ‘नमुंमपा'ची हद्द सुरु होत असून तेथून दोन्ही बाजुने रस्त्याची आणि दुभाजकाची स्वच्छता करुन घ्यावी. शीळ-एमबीआरचा परिसरही छोटी शोभिवंत झाडे लावून सुशोभित करावा. तेथून महापालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टी भागाला तसेच जुन्या पाड्यांना पाणीपुरवठा होत असून तो वाढविण्याची गरज लक्षात घेत तशा प्रकारची मागणी शासन स्तरावर करण्यासाठी प्रस्ताव करण्यात यावा. शीळ-एमबीआर जवळ तसेच महापालिकेची हद्द जिथून सुरु होते, त्या सर्व दिशांवरील रस्त्यांवर शहराच्या नावलौकिकाला साजेशा आकर्षक कमानी उभारावी, अशा सूचना आयुवत डॉ. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
अडवली, भूतावली गांव आणि परिसरात स्वच्छता वाढीवर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे तेथील नागरी आरोग्य केंद्र तसेच शाळा इमारत आणि परिसरातही स्वच्छता आणि नीटनेटकेपणा यामध्ये सुधारणा कराव्यात. परिमंडळ उपायुक्त आणि कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त यांनी शाळांना नियमित भेटी देऊन तेथील सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.