राखीव भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यास चालढकल

वाशी : वाशी एपीएमसी सेक्टर-१९ मधील राखीव भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी वारंवार करुन देखील कारवाईस दिरंगाई होत असल्याने अखेर वाशी सेक्टर-२६, कोपरीगाव मधील रहिवाशांनी येत्या २४ डिसेंबर २०२४ रोजी नवी मुंबई महापालिका आणि सिडको विरोधात जनआंदोलन पुकारले आहे.

वाशी एपीएमसी परिसरात सेक्टर-१९ येथे सिडको मार्फत भूखंड आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या भूखंडावर भूमाफियांकडून दिवसेंदिवस अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी अल्पावधीतच मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे. तसेच या ठिकाणी वाहनतळ, गॅरेज चालवले जात आहे. त्यामुळे सदर ठिकाण अंमली पदार्थ विक्रेत्यांचे आश्रयस्थान बनले असून, येथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. याशिवाय रात्री देहविक्रीचा व्यवसाय जोरात चालत असल्याचा आरोप होत आहे. कोविड काळात अनधिकृत झोपडपट्टी, व्यावसायिक गाळे तसेच अवजड वाहन तळ निर्माण करण्यात आले आहे. यामुळे रहिवाशी परिसरात चोरी, गर्दुल्यांचा वावर, मोबाईल स्नॅचींग, वाहन चोरी, अपघात तसेच देहविक्री व्यवसाय होत आहे. याविरोधात नागरिक वारंवार तक्रार करुनही प्रशासन कारवाईच्या नावाखाली बघ्याची भुमिका घेत आहे.

तसेच पोलिसांकडून नवी मुंबई परिसरात होणारी ड्रग्स विरोधी कारवाई सर्वात अधिक याच झोपडपट्टीत होत आहे. त्यामुळे सदर अनधिकृत झोपडपट्टीकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष नागरिकांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. यामुळे वाशी सेक्टर-२६, कोपरीगाव मधील नागरिकांनी सदर अनधिकृत झोपडपट्टी विरोधातील लढाई स्वतः लढायचे ठरवले असून, प्रशासन जागे व्हावे यासाठी येत्या २४ डिसेंबर २०२४ रोजी नवी मुंबई महापालिका आणि सिडको विरोधात जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीक रस्त्यावर उतरल्याने किमान प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल अशी अपेक्षा आहे, असे ‘नवी मुंबई प्रतिष्ठान'चे अध्यक्ष संकेत डोके यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उल्हासनगर शहरातील वाहतूक समस्या जटील