नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
कोपरखैरणे मधील वाहतूक कोंडीने नागरिक बेजार
वाशी : कोपरखैरणे मधील डी मार्ट सर्कल ते यशवंतराव चव्हाण शाळा पर्यंतच्या दोन्ही बाजूला सम-विषम पार्किंगचे नियम सध्या लागू आहेत. परंतु, सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. मात्र, त्याचवेळी रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे डी मार्ट सर्कल ते यशवंतराव चव्हाण शाळा दरम्यान ३०० मीटर रस्ता ‘नो पार्किंग झोन' करण्यात यावा, अशी मागणी ‘भारतीय मराठा महासंघ'चे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी नवी मुंबई वाहतूक विभागाकडे केली आहे.
कोपरखैरणे विभागात वाहनांच्या पार्किंगकरिता कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर एकमेव ‘पे अँड पार्क'ची व्यवस्था उपलब्ध आहे. संपूर्ण कोपरखैरणे भागात इतर कोणत्याच ठिकाणी वाहनतळ उपलब्ध नाही. तसेच कोपरखैरणे मधील बहुतांशी गृहसंकुलातील नागरिक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रस्त्यावरच बिनधास्तपणे वाहने उभी करीत आहेत. कोपरखैरणे सेवटर-२२ येथून हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीपर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकी दरम्यानचा रस्ता वाशी, एपीएमसी मधील वाहन चालकाना मुख्य रस्ता आहे. सदर रस्ता घणसोली, महापे, ऐरोली, मुलंड यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. कोपरखैरणे तीन टाकी ते डी मार्ट पर्यंतच्या रस्त्यावर तर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली असते. तसेच पुढे कोपरखैरणे बस स्थानक, माथाडी रुग्णालय या परिसरात देखील वाहनांची पार्किंग होत असते. या परिसरालगत शाळा, महाविद्यालय असल्याने याठिकाणी वाहनांना बरोबर पादचाऱ्यांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. मात्र, चिंचोली रस्त्यावर दुतर्फा पार्किंग आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना गर्दीतून वाट काढणे देखील जिकरीचे होते. सध्या येथे सम-विषम पार्किंग नियम लागू आहे. परंतु, तरीही येथून ये-जा करणारी मोठी वाहने, बस, ट्रक इत्यादी वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे कोपरखैरणे डी मार्ट सर्कल पासून २०० ते ३०० मीटर अंतराचा यशवंतराव चव्हाण शाळा पर्यंतच्या रस्त्यालगत ‘नो पार्कींग झोन' करावा, अशी मागणी प्रसाद घोरपडे यांनी नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे केली आहे.