नवीन ठाणे रेल्वे स्थानकाशेजारील हायटेन्शन वाहिनीबाबत तत्काळ तोडगा काढा

ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकांच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयालगत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदि अनुषंगिक कामे ‘रेल्वे'कडून तर परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदि अनुषंगिक कामे ‘स्मार्ट सिटी'च्या वतीने करण्यात येत आहेत. सदर कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, ‘महावितरण'चे अधिकारी उपस्थित होते.

या पाहणी दरम्यान सदर प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. ‘मध्य रेल्वे'च्या मार्गावरुन जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये, यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत तात्परुती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले. तसेच सदर वाहिनीचा टॉवर हटवून वाहिनी भूमीगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान आयुक्त राव यांनी आतापर्यंत झालेले काम, पोहोच मार्गाचे काम, पुल आदि कामांचा आढावा घेतला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावणे मधील आदिवासींची पाण्यासाठीची पायपीट कायम