डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांचे वैचारिक अभिवादन

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर जनसागर ओसंडून वाहत असतो. येथे महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच देशाच्या विविध राज्यांतून व परदेशातूनही नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहत असतात.

या नागरिकांना नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील ज्ञानस्मारक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मिळावी आणि चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांनी ऐरोली येथील ज्ञानस्मारकाला आवर्जून भेट द्यावी याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली चैत्यभूमीवर ज्ञानस्मारकाची माहिती प्रसारित करणारा स्टॉल प्रदर्शित करण्यात आलो. ५ डिसेंबर रोज रात्रीपासूनच या स्टॉलला भेट देण्यास नागरिकांनी सुरुवात केल्यानंतर ६ डिसेंबर रोजी सायं.७ वाजेपर्यंत ३० हजाराहून अधिक नागरिकांनी माहिती जाणून घेतली आहे. आमदार गणेश नाईक यांनी याठिकाणी भेट देत अभिवादन केले.

यामधील बहुसंख्य नागरिकांनी ऐरोली येथील ज्ञानस्मारक स्थळी भेट देऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केले आहे. स्मारकामध्ये पहाटेपासूनच नागरिकांनी भेट देण्यास सुरुवात केली असून सायं.७ वाजेपर्यंत ११ हजाराहून अधिक नागरिकांनी स्मारकातील विविध सुविधा दालनांना भेट देत या स्मारकाचे ज्ञानस्मारक असे नाव सार्थ असल्याचे अभिप्राय व्यक्त केले आहे. स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने अल्पोपहार आणि चहापान व्यवस्था करण्यात आली आहे.  

सदर स्मारकामध्ये असलेले बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मिळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष छायाचित्र दालन पाहताना नागरिक भारावून जातात. याठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह ५ हजाराहून अधिक पुस्तकांनी समृध्द असलेल्या ग्रंथालयामुळे माहिती आणि ज्ञानाचा खजिनाच नागरिकांपुढे खुला होतो. विशेषत्वाने युवा पिढी पुस्तक हातात घेऊन वाचत असल्याचे चित्र मोठ्या संख्येने बगायला मिळाले. याशिवाय ग्रंथालयात असलेल्या बालसाहित्याच्या कक्षातही मुलांची पुस्तके वाचण्यासाठी गर्दी दिसून आली. यंदाचे वर्ष ‘भारतीय संविधान'चे अमृत महोत्सवी वर्ष असून ग्रंथालयातील संविधान कक्षात असलेली ‘संविधान'च्या मूळ प्रतीची प्रतिकृती बघण्यासाठी तसेच संविधानावरील ग्रंथसंपदा चाळताना नागरिक उत्साही होते.

या सोबतच आभासी चलचित्र प्रणाली द्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण होलोग्राफिक प्रेझेन्टेशन सुविधेद्वारे ऐकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. स्मारकाच्या वरील मजल्यावर असणारे ध्यानकेंद्र पाहून बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वासारखी स्मारकाची भव्यताही लोकांनी अनुभवली. ध्यान केंद्रातील आनापान ध्यान शिबीराचा लाभही अनेकांनी घेतला. लांबूनच ५० मीटर उंचीचा पेनच्या नीबच्या आकाराच्या भव्यतम डोम स्मारकाबद्दल मनात उत्सुकता निर्माण करतो आणि बाबासाहेबांच्या ज्ञान संपनतेचे दर्शन घडवतो. अशा सर्व गोष्टींमुळे ज्ञानस्मारकाला भेट दिल्यानंतर बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांची भेट देऊन धन्य वाटले, असे अभिप्राय अनेक नागरिकांनी व्यक्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर येथील क्लस्टरबाबत सभा