आता लागलेले निकाल नंतर बदलणार आहेत 

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत आपल्याला कमी जागा मिळाल्या असल्या तरी खचून जाऊ नका. या निवडणुकीत ज्या शक्तीच्या विरोधात आपण मुकाबला केला, ते आपले मोठे यश आहे. आपल्याकडे संघटनात्मक ताकदीचे मोठे बळ असल्याने  आता लागलेले निकाल नंतर बदलणार आहेत. त्यामुळे उठा, नव्या उमेदीने कामाला लागा, यश आपल्यालाच मिळणार आहे, असा सल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी शिवसैनिकांना दिला. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळाव्यात ते बोलत होते.

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवारी सायंकाळी शिवसेनेचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेना ही संघर्षातून उभी राहिली आहे. त्यामुळे यश आणि अपयशाची शिवसैनिक कधीच पर्वा करीत नाहीत. सर्व पक्षांपेक्षा आपले संघटनात्मक बळ हे मोठे आहे. याच बळाच्या जोरावर आपण यश खेचून आणणार आहोत. या निवडणुकीत आपली लढाई फक्त भाजप आणि शिंदे गटाबरोबर नव्हती तर ईव्हीएम, केंद्राचे बाहुले म्हणून काम करणारा निवडणूक आयोग आणि सत्ताधार्‍यांच्या ओंजळीने पाणी पिणारे प्रशासन यांच्या विरोधात होती. परिस्थिती प्रतिकूल असताना आपणही ताठपणे उभे राहून १५ आमदारांचे २० करून दाखवले. त्यामुळे आपण हरलो नसून जिंकलो आहोत, हे लक्षात ठेवून कामाला लागा, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

याप्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, प्रवक्ते अनिश गाढवे,  एम. के. मढवी, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, संदीप पाटील, सूर्यकांत मढवी, शहरप्रमुख काशिनाथ पवार, प्रवीण म्हात्रे, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, उपजिल्हा संघटक विनया मढवी, वैशाली घोरपडे, शहर संघटक कोमल वास्कर, सुनीता मांडवे, शशिकला पराजुली, उषा रेणके, सतीश रामाणे, रंगनाथ औटी, स्मिता धमामे, अजय पवार आदी उपस्थित होते.

आक्षेप घेतले; पण कारवाई नाही...

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये १ लाख ६६ हजार दुबार मतदार आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३९ हजार नावे दुबार आहेत. या दुबार मतदारांना यादीतून वगळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वेळा आक्षेप घेण्यात आला. मात्र सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यानुसार काम करणार्‍या निवडणूक आयोगाने या दुबार नावांवर कोणतीही कारवाई केली नाही, असे यावेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी स्पष्ट केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था'मध्ये शैक्षणिक प्रारंभ