यंदा परदेशी हापूस आंब्याची चव कमी चाखायला मिळणार

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात दरवर्षी नोव्हेंबर महिना अखेरीस परदेशी मलावी हापूस आंबा दाखल होतो. परदेशी मलावी हापूस आंब्याला दिवसेंदिवस मागणी वाढत असते. मात्र, यंदा मलावी हापूस आंब्याचे उत्पादन अवघे ५० टक्के असल्याने वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात एक दिवस आड करुन मलावी हापूस आंबा दाखल.होत आहे. त्यामुळे यंदा परदेशी आंब्याची चव कमी चाखायला मिळणार आहे, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील परदेशी मलावी हापूस आंबा व्यापाऱ्यांनी दिली.

दरवर्षी कोकणातील हापूस आंब्याची.चव चाखण्यासाठी ग्राहक या आंब्याची.वाट पाहत असतात. हापूस आंबा अवीट गोडीसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला जितकी मागणी भारतात असते तितकीच मागणी परदेशात देखील असते. मात्र, कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम मार्च मध्ये सुरु होतो. दरवर्षी कोकणातील हापूस आंबा परदेशात दाखल होतो त्याचप्रमाणे मागील काही वर्षांपासून आफ्रिका खंडातील मलावी हापूस आंबा भारतात दाखल होत आहे. मलावी हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध  कोकणातील हापूस आंबा प्रमाणेच असल्याने आणि बाजारात मलावी हापूस आंबा लवकर दाखल.होत असल्याने या आंब्याला चांगली मागणी असते. वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात मलावी हापूस आंबा नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये दाखल होतो. परंतु, यंदा उत्पादन कमी असल्याने वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात डिसेंबर-२०२४ अखेर पर्यंत मलावी हापूस  हंगाम असणार आहे. मागील वर्षी आतापर्यंत ३ हजार बॉक्स दाखल झाले होते तर यंदा आतापर्यंत केवळ १२०० बॉक्स मलावी हापूस आंबा दाखल झाला आहे. सध्या एपीएमसी फळ बाजारात १२०० बॉक्स मलावी हापूस आंबा दाखल झाला असून, तीन किलो पेटीला २२०० -५००० हजार रुपये बाजारभाव आहे. यंदा मलावी हापूस आंब्याचे उत्पादन ५०टक्के आहे. त्यामुळे वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात मलावी हापूस आंबा आवक कमी होईल तसेच आकाराने लहान असलेले हापूस अधिक दाखल होत आहेत, अशी माहिती एपीएमसी फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरण पूरक शाडुच्या श्री गणेशमूर्ती बनविण्याचे आवाहन