नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘उरण'साठी ‘एनएमएमटी' पुन्हा सुरु
उरण : फेब्रुवारी २०२४ मध्ये उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईकरांसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची बससेवा (एनएमएमटी) प्रशासनाने कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून अनिश्चित काळासाठी उरण विभागासाठी सेवा बंद केली होती. अखेर प्रवाशांकडून बसमार्ग सुरु करण्यासाठी सातत्याने होणारी मागणी आणि उरणकर प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेऊन नमुंमपा परिवहन उपक्रमाने जवळपास १० महिन्यांनंतर पुन्हा उरणसाठी २७ नोव्हेंबर पासून ‘एनएमएमटी'ची सेवा सुरु केली आहे. यामुळे उरणकर प्रवाशी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अनेक वर्षांपासून उरण तालुक्यात सुरु असलेली एनएमएमटी बससेवा २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानक बंद करण्यात आली होती. खोपटे येथे झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर उरण ते कोपरखैरणे, जुईनगर रेल्वे स्थानक, कळंबोली दरम्यानच्या ३०, ३१ आणि ३४ या क्रमांकाच्या मार्गावरील ‘एनएमएमटी'ची बससेवा परिवहन उपक्रमाकडून पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे स्वस्तातील प्रवास अर्थात उरणकरांनी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले खरे; पण, उरण ते बेलापूर, नेरुळ मार्गावर उरण रेल्वे स्थानकातून एका तासाच्या अंतराने लोकल सुटत आहेत. त्यामुळे नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासभर लोकलची वाट पहावी लागत होती. शिवाय उरण शहरातून रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना रिक्षा प्रवासासाठीे अधिकचे भाडे मोजावे लागत होते. या समस्येमुळे शहरातून आणि तालुक्यातील गावाजवळून जाणाऱ्या ‘एनएमएमटी'चा प्रवास अधिक सोयीचा होता.
एनएमएमटी बंद झाल्याने व्यवसाय, नोकरी, धंदा, कार्यालयीन आणि दैनंदिन कामासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत होते. त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान देखील होत आहे. याशिवाय दहावी, बारावी तसेच विविध कोर्स तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी उरण तालुक्यातील विद्यार्थी मुंबई, नवी मुंबई मध्ये शिकण्यासाठी मोठया प्रमाणात जात असतात. या सर्वांसाठी एनएनएमटी बसने प्रवास करणे सुरक्षित एकमेव आणि उत्तम पर्याय होता. मात्र, एनएमएमटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत होते. बससेवेअभावी नागरिकांना अनेक समस्येचा सामना करीत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे ‘एनएमएमटी'ची बससेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी उरणकर नागरिकांकडून केली जात होती. मार्कस्वादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, जनवादी महिला संघटना, उरण सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संस्था, मॉर्निंग कट्टा ग्रुप, ‘मनसे'चे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, संतोष पवार, संजय ठाकूर यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटना यांनीही एनएमएमटी सुरु करण्याबाबत परिवहन उपक्रमाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. अखेर या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी ‘एनएमएमटी'चा बसमार्ग पुन्हा सुरु होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, संजय ठाकूर, प्रकाश पाटील, ‘जनवादी महिला संघटना'च्या अध्यक्षा हेमलता पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी बस चालक आणि वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उरण तालुक्यात ‘एनएमएमटी'ची बससेवा सुरु व्हावी यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला. आमच्या मागणीला यश आले आहे. आता उरणकर जनतेचा प्रवास सुलभ, आनंददायी, सुरक्षित होणार आहे. त्यांच्या पैशांची आणि वेळेची सुध्दा बचत होणार आहे. उरणकरांसाठी तो महत्वाचा निर्णय आहे. आम्ही नमुंमपा परिवहन उपक्रमाचे आभार मानतो. ‘एनएमएमटी'ने बससेवा कायमची सुरळीतपणे चालू ठेवावी. तसेच प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, हीच आमची प्रमुख मागणी आहे.
-कॉम्रेड भूषण पाटील, माजी विश्वस्त-जेएनपीटी.
बंद असलेली बससेवा विविध सामाजिक संस्था, संघटना, जनता यांच्या आग्रहास्तव सुरु केली आहे. याचा फायदा प्रवाशी वर्गाला होणार आहे. उरण विभागातील प्रवाशी वर्गांनी याचा लाभ घ्यावा.
-योगेश कडुस्कर, व्यवस्थापक-नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम.
उरण शहराला जोडणारी एनएमएमटी बससेवा काही कारणास्तव अनिश्चित काळासाठी बंद झाल्याने त्याचा त्रास नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत होता. बससेवा सुरु करण्यासाठी उरणकरांच्या वतीने वारंवार मागणी केल्याने उरण शहरात ३० आणि ३१ मार्गिव्ोÀवरील बससेवा सुरु झाली आहे. त्याचा फायदा निश्चितच उरणच्या जनतेला होणार आहे. त्याबद्दल एनएमएमटी प्रशासनाचे आभार. तसेच उरण पूर्व विभागातील गावांना जोडणारी ३४ क्रमांकाची बससेवा देखील लवकरच पूर्ववत सुरु करावी.
-संजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    