नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग
भिवंडी : भिवंडी शहरातील नागांव परिसरातील फातमा नगर येथील भंगाराच्या गोदामाला २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत मोठ्या प्रमाणात भंगारासह आजुबाजुची घरेही जळून खाक झाली आहेत. तर या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे.
नागांव येथील अनमोल हॉटेलच्या पाठीमागे मरीहम मस्जिद जवळील मोठ्या प्रमाणात भंगार साठवलेल्या गोदामाला २२ नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. यानंतर या आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन एकच गोंधळ उडून नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, आग पसरत गेल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. पाहता पाहता या भंगार गोदामाच्या सभोवतालची अनेक घरे या आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने त्या घरांचीही राख रांगोळी झाली.त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. तर या आगीचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात पसरले होते.
सदर आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाकडून प्रथम दोन गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या होत्या. परंतु, आगीचे ठिकाण दाटीवाटीत असल्याने अग्निशमन गाड्यांना सदर ठिकाणी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली होती.
त्यातच आगीची तीव्रता वाढत गेल्याने अग्निशमन दलाची आणखी एक गाडी अशा ३ गाड्या आणि २ टँकर यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर तब्बल ३-४ तासाने सदरची आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
दरम्यान, या आगीचे कारण अस्पष्ट असून शुक्रवारी सुट्टीचा दिवस असल्याने सदर गोदामात कामगार नसल्याने आगीत फक्त वित्तहानी झाली असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    