नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
बाजारात प्रदूषणविरहित ग्रीन फटाक्यांची आतिषबाजी
वाशी : प्रकाशाचा सण असलेला दिवाळी सण सुरु झाला असून, फराळ, कंदील, रांगोळी आणि पणत्या,कपडे त्याच बरोबर फटाक्यांची देखील आतिषबाजी केली जाते. त्यामुळे दिवाळी सणासाठी बाजारात विविध फटाके दाखल होत असतात. मात्र, अलिकडे फटाक्यांमुळे होणारे वाढते प्रदूषण पाहून नागरिकांनी प्रदूषणविरहित ग्रीन फटाके फोडण्यास अधिक पसंती दिली आहे.त्यामुळे ग्रीन फटाक्यांनी बाजारपेठ फुलली आहे.
फटाक्यांच्या आतिषबाजी शिवाय दिवाळी साजरी केल्यासारखी वाटत नाही. दिवाळी सणात फटाक्यांचा बार उत्साहाने उडवला जातो. दरवर्षी दिवाळी निमित्त बाजारात नवनवीन फटाके येत असतात. तसेच यंदाही बाजारात सर्वाधिक इकोफ्रेंडली फटाक्यांचा ट्रेंड आहे. नवी मुंबई शहरात महापालिकेने नेमून दिलेल्या जागेत बोनकोडे, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, तुर्भे, एपीएमसी मार्केट इत्यादी ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. या ठिकाणी लहानग्यांपासून मोठ्यांसाठी सर्व प्रकारचे फटाके, फुलबाजे, पाऊस उपलब्ध आहेत. दिवाळी सणात फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रदूषण विरहित आवाज आणि वायू प्रदूषण कमी करणारे ग्रीन फटाके दाखल झाले आहेत. पर्यावरण पूरक फटाके विक्री करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सर्वच पर्यावरण पूरक फटाक्यांवर ग्रीन लोगो देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता फटाके प्रेमींना पर्यावरण पूरक फटाके वाजवायचे असतील तर त्यांच्यासाठी बाजारात ग्रीन लोगो असलेले पर्यावरण पूरक फटाके घेणे सोयीस्कर झालेले आहे. मात्र, यंदा फटाक्यांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा ग्राहकांना फटावयांसाठी १०० ते २०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
ग्रीन फटाक्यांमध्ये ग्राऊंड चक्र, फुलझडी, बटर पलाय, कलर पेन्सिल, पॉपधमाका, लेस, रॉकेट, सुरसुरी, लेझर शो, पलाय मशीन, कलर फॉग एग आदी फटाक्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे. किटकॅट फुलझडी, प्लॅस्टिक बंदूक, सायरन फुलझडी, मल्टीकलर पेंटिंग, ४-स्क्वेअर, थ्रीडी, टायटॅनिक, क्रेकलिंग, जम्बो क्रेकलिंग, पुलिंग थ्रेड, पॉपअप अँग्री बर्डस आदी कमी आवाजाच्या फटाक्यांचा पर्याय उपलब्ध आहे. तर लवंगी फटाक्यांची जागा इतर फटाक्यांनी घेतली आहे. फुलझडीचे १० नग १२० रुपये तर पाऊस ४०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. लाल फटाके २० ते १०० रुपयांना उपलब्ध आहेत. तर भुईचक्र १० नग ३०० रुपयांना उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी आकर्षिक असा पुलिंग थ्रेड, पॉप अँग्री बर्ड, फोटो पलॅश, चिटपुट, जम्पिंग फ्रॉग आदी फटाक्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
फटाके           दर
पाऊस       २५०-४०० रुपये
फुलबाजा   ३००-४०० रुपये
लवंगी       १५०-२०० रुपये
भुईचक्र    २५०-३०० रुपये
रॉकेट      २५०-३५० रुपये
बटरपलाय २५०-३०० रुपये
रशी बॉम्ब  ३०-४० रुपये प्रतिनग
दिवाळी सणात पर्यावरण पूरक फटाक्यांना जास्त मागणी असून, यंदा फटाक्यांच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. -  महेश लांजेकर, फटाके विक्रेता - वाशी. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    