नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
घसरलेला लोकलचा डब्बा ३ तासाने रुळावर
कल्याण : १८ ऑक्टोबर रोजी रात्री कल्याण रेल्वे स्थानकावर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनचा शेवटचा डबा रुळावरुन घसरल्याची घटना घडली. कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-२ वर सदर घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर तब्बल ३ तासांनी अपघातग्रस्त डब्बा रुळावर आणल्याने रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु झाली.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण येथील रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. १८ ऑक्टोबर रोजी टिटवाळा येथून सीएसएमटी कडे जाणारी लोकल कल्याण रेल्वे स्थानकावर येत असताना रात्री ८.५५ वाजता सदरचा अपघात झाला. त्याच क्षणी गार्डच्या बाजुचा शेवटचा डबा रुळावरून घसरला. रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल मध्ये कमी प्रवासी होते आणि ती आधीच कल्याण स्थानकात पोहोचली होती. त्यामुळे लोकलचा वेग कमी झाला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सदर घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी, आरपीएफ आणि इतर तांत्रिक पथके घटनास्थळी दाखल झाली आणि रुळावरून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
अपघातादरम्यान लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी काही काळासाठी घाबरले होते. रुळावरुन लोकल घसरल्याने कल्याण आणि सीएसटी दरम्यानच्या रेल्वे सेवांवरही परिणाम झाला. ‘मध्य रेल्वे'चे मुख्य प्रवक्ते डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले की, कल्याण ते कसारा दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. डाऊन मार्गावरील पंजाब मेलसह ३ गाड्या खोळंबल्या. या घटनेने कामावरुन घरी जाणाऱ्या तसेच नाईटशिपटला जाणाऱ्या चाकरमान्यांना उशीराला सामोरे जावे लागले.
दरम्यान, लोकलचा डबा घसरल्याची बातमी कळताच त्यामधील प्रवाशांच्या मदतीला शिवसेना उबाठा गटाचे रुपेश भोईर धावून आले. रूपेश भोईर यांनी रेल्वे रुळापासून पत्री पुलापर्यंत येण्यासाठी पायवाट करुन दिली. तसेच रात्रीच्या अंधारात हॅलोजन लावून लाईटची व्यवस्था केली. जवळपास शेकडो लोकांना मदतीचा हात आणि पिण्याचे पाणी रुपेश भोईर यांनी उपलब्ध करून दिले.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    