नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण उपचाराच्या प्रतिक्षेत
उरण : उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत राहावे लागल्याने येथील रुग्णांनी संताप व्यक्त केला. याची चित्रफित समाज माध्यमातून पसरली गेल्याने, नागरिकांनीही कोप्रोली आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
बऱ्याच वेळा या रुग्णालयात श्वान दंशाचे इंजेक्शन, विंचू, सर्पदंशावरील औषधे उपलब्ध नसल्याच्याही तक्रारी लोकांकडून ऐकावास मिळत आहेत. उरण पूर्व ग्रामीण विभागात आदिवासी आणि शेतकरी नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या शेतकरी आणि आदिवासी नागरिकांचा निसर्गाशी संबंध येत असल्यामुळे त्यांना अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका असतो. सर्पदंश झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी आवश्यक औषधे या रुग्णालयात उपलब्ध व्हावीत. तसेच सर्पदंशावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक इथे करावी. जेणेकरुन जीवावर बेतणाऱ्या या रुग्णांना उपचारासाठी लांबचा पल्ला गाठावा लागणार नाही, अशी मागणी येथील शेतकरी आणि आदिवासी बांधवांमधून सातत्याने केली जात आहे. मात्र, संबंधित शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर उपचार होत नसल्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना उरण किंवा नवी मुंबई येथे धाव घ्यावी लागते.
एकंदरीत विकसित उरणच्या ग्रामीण आणि गरीबांच्या सार्वजनिक आरोग्य सेवेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष सुरु आहे. तालुक्यातील आदिवासी, शेतकरी बांधवांसह गरीब घरातील रुग्णांना ग्रामीण आरोग्य व्यवस्था हाच प्रमुख आधार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून कोप्रोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली आहे.
देशातील उरण सारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक तालुक्यात अपुरी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे. याचा फटका येथील गरीब, सामान्य नागरिकांना बसत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी करुनही शासन यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे सदर परिसर डोंगराळ आहे. त्यामुळे शेतकरी आणि आदिवासींना होणाऱ्या विंचू किंवा सर्प दशांवर वेळेत प्राथमिक उपचार न झाल्यास रुग्णांवर प्रसंगी प्राण गमविण्याची वेळ येऊ शकते. अशा प्रकारची घटना मार्च महिन्यात चिरनेर परिसरात घडली असून त्याची लेखी तक्रार आपण केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत ठाकूर यांनी सांगितले.
रस्ते विकासामुळे मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेल शहरे जवळ आली असली तरी येथील खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार घेणे ग्रामीण भागातील रुग्णांना परवडत नाही. तरीही नवी मुंबई महापालिका, पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय यांचा उरण मधील रुग्णांना आधार आहे. मात्र, किमान प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी किमान अपेक्षा येथील नागरिकांची असताना, कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्यवस्थेमुळे ती पूर्ण होताना दिसत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
कोप्रोली आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यातील एक वैद्यकीय अधिकारी निवासी असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली असून, रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते का? या संदर्भात चौकशी करु.
-जयवंत ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    