नायलॉन मांजामुळे ठाकरे उड्डाणपुलावर अपघातसत्र सुरुच

भिवंडी : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या संख्येने पतंग विक्री होते. परिणामी, अनेक ठिकाणी पतंग उडवण्यासाठी मुलांमध्ये अहमिका लागते. तसेच आपली पतंग कोणी कापू नये म्हणून सुरु असलेल्या स्पर्धेसाठी हीच मुले नायलॉन मांजाचा उपयोग करतात. अशावेळी त्याचा दुष्परिणाम काय होईल याचा यत्किंचितही मागमुस नसलेल्या या मुलांच्या स्पर्धा दिवसेंदिवस वाढीस लागल्या आहेत. याच नायलॉनच्या मांजाने गेल्या २ वर्षांपासून भिवंडीत स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर दुचाकी चालकांचे अपघात होत असून २ वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला तर यावर्षी एकाच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने तो थोडवयात बवाचला.

दरम्यान, या दोन्ही घटना याच पुलावर झाल्याने निरीक्षण करून पुलाच्या दोन्ही बाजुच्या कंपाऊंड वॉलवर ठाण्यातील पुलाच्या धर्तीवर लोखंडी पत्रे अथवा लोखंडी जाळी लावण्याची मागणी वाढू लागली आहे.

भिवंडी महपालिका हद्दीतील कल्याण रोड येथे साईबाबा मंदिरापर्यंत स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल बनविलेला आहे. वास्तविक सदर उड्डाणपुल अशोकनगर ते साईबाबा मंदिरापर्यंत होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाने पुल राजीवगांधी उड्डाणपुलाच्या जोडला आहे. या उड्डाणपुलावरील दोन्ही बाजुच्या वॉल कमी उंचीच्या आहेत. तसेच या पुलाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. याच इमारतीमधून पतंगाचा मांजा सहजपणे पुलावरील दुचाकींना त्रास देणारा ठरु शकतो.

शहरात एकूण ३ उड्डाणपुल आहेत. परंतु, ठाकरे उड्डाणपुलावरच दोन घटना घडल्या आहेत. १४ जानेवारी २०२३ रोजी उल्हासनगर येथील संजय हजारे (४७) या उड्डाणपुल मार्गे दुचाकीवरुन घरच्या दिशेने जात असताना नायलॉन मांज्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर यावर्षी काही दिवसांपूर्वी याच उड्डाणपुलावरून दुचाकीने जुनांदुर्खी-टेंभवली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच महेंद्र पाटील (३१) आपल्या मित्रासोबत कल्याण येथे जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर मांजा गुंडाळून पतंग अडकली. वेगाने जाणाऱ्या महेंद्र पाटील यांनी हेल्मेट घातलेले असल्याने नायलॉन धाग्याने हेल्मेटचा पट्टा कापला गेला. हेल्मेटमुळे गळ्याला कोणतीही इजा न झाल्याने त्यांचे प्राण वाचले. ठाकरे उड्डाणपुलावरून सर्रासपणे दुचाकी वाहने कायम धावत असतात. पतंगाच्या धाग्याने त्याच्या जीवास धोका निर्माण होऊ नये म्हणून या पुलाच्या दोन्ही कडेला लोखंडी पत्रे लावावेत, अशी मागणी वाहन चालकां कडून होऊ लागली आहे.

जीवघ्ोण्या नायलॉन धाग्याच्या विक्रीवर बंदी असतानाही भिवंडीत मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होत आहे. मांज्यामुळे राज्याच्या काही भागात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी भिवंडी शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

केवळ मांज्याच्या घटनेसाठी म्हणून उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला पत्रे लावण्याबाबत नागरिकांची मागणी असली तरी याबाबत सर्वेक्षण करुन त्याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल.
-जमील पटेल, शहर अभियंता, भिवंडी महापालिका.    

नायलॉन मांजाने पुन्हा दुचाकीस्वाराचा कापला गळा...
स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर १२ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा दुचाकीस्वार तरुणाचा नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याची घटना घडली आहे. मसूर खान (२४) असे गळा कापून जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो नेहमीप्रमाणे कल्याण येथून घरी वंजारपट्टी नाक्याच्या दिशेने निघाला होता. उड्डाणपुलाच्या मध्यावर येताच त्याचा गळा नायलॉनच्या मांजाने कापला गेल्याने तो रक्तबंबाळ स्थितीत जागेवरच कोसळला. यावेळी नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जुहूगांव चौपाटीवरील धारण तलावात शेवाळचे साम्राज्य