‘दिबां'च्या जयंतीदिनी वाशीत विविध उपक्रम संपन्न
नवी मुंबई : भारतातील शेतकऱ्यांचे आणि प्रकलपबाधितांचे कैवारी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्ताने १३ जानेवारी रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘दिबां'च्या संघर्षमय, वैधानिक आणि प्रेरणादायी कार्याचे स्मरण करतानाच अभिवादन म्हणून ‘दिबां'च्या संघर्षमय जीवनाचे चित्रप्रदर्शन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, जेष्ठ नागरिक, कचरावेचक भगिनी, कर्तव्यदक्ष महिला रिक्षा चालक भगिनी सत्कार, पाणपोई लोकार्पण आणि अन्य उल्लेखनीय सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे विविध सामाजिक उपक्रम नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीने राबविण्यात आले.
या कार्यक्रमास राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांंची प्रमुख उपस्थिती लाभली. तर माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, जयवंत सुतार, डॉ. अनंत हर्षवर्धन, रंगकर्मी रविंद्र वाडकर, निकोलस अल्मेडा, जयेश आक्रे, दिलीप पागदारे, भुवनेश्वर धनु, डॉ. गजेंद्र भानजी, प्रतिभा वैती, राजश्री भानजी, स्मिता तरे, हेमंत वैती, धीरज कालेकर, राकेश कोळी, महादेव वैती, सुधाकर पाटील, दिपक पाटील, सुरेश ठाकूर, सुनील कटेकर, आनंद सिंग, विजय पाटील, देवेंद्र खाडे, ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, निशांत भगत, संदीप भगत, शशांक कट्टे, आयोजक आदि उपस्थित होते.
दि. बा. पाटील .एक विचार आहे. ‘दिबां'च्या नेतृत्वाखाली तत्कालीन सिडको विरोधातील संघर्षात सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि विविध प्रांतीयांनी सहभाग नोंदविला होता. ‘दिबां'चे धगधगते विचार ऐकून ऊर्जा आणि स्फुर्ती मिळत असे, ज्याचे स्मरण आजही मला होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां'चे नाव लागणार, असा विश्वास मला आहे. नामकरण चळवळ सर्वांनीच जिद्दीने मनावर घेतली आहे. लवकरच याबाबतीत राज्य आणि केंद्र स्तरावर शासकीय सोपस्कार पार पडून येत्या काही महिन्यांतच जनभावनेचा आदर करुन निर्णय होईल. नवी मुंबईच्या विकासाबाबत मी कटीबध्द आहे आणि राहीन, अशी ग्वाही ना. गणेश नाईक यांनी दिली.
‘दिबां'सारख्या युगपुरुषांनी संघर्ष करुन पिडीीत आणि बाधितांना न्याय मिळवून दिला. याचे चिरंतन स्मरण रहावे म्हणून वर्तमान आणि आगामी काळात पिडीत आणि बाधित घटकांच्या न्यायासाठी चळवळी, क्रांती झाल्या पाहिजेत, असा प्रमुख संदेश यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न आयोजक संस्थांचा आह. ‘दिबां'सारखे जन्म घेऊन आपले आयुष्य बाधितांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणारे चळवळकार निरंतर आणि चिरंतन निर्माण होऊन चळवळी जिवंत राहिल्या पाहिजेत, असे या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मुळ उद्दिष्ट असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.
नवी मुंबई शहराच्या निर्मिती पूर्वार्धात आणि निर्मिती दरम्यान दिलेल्या संघर्षातून साडेबारा टक्के जमिनीचा परतावा अर्थात जमिनीच्या बदल्यात जमीन आणि प्रचलित बाजार मुल्यानुसार रक्कमेचा परतावा असा देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एकमेव शासन निर्णय घेण्यास भाग पाडणारे नेते म्हणजे दि. बा. पाटील हेच होत. साडेबारा टक्केच्या या निर्णयामुळेच या जमिनींवर (भूखंडांवर) उभ्या राहिलेल्या हजारो इमारतींमधील लाखो घरांमध्ये आजमितीस ठाणे तालुक्यातील नवी मुंबई, पनवेल आणि उरण या तालुक्यातील सिडको निर्मित शहरांतील ३० टक्के लोकसंख्या परवडणाऱ्या अशा घरात लाभदायिक म्हणून वसलेली आहे. ती ‘दिबां'ची देण आहे, याची जाणीव प्रामुख्याने येथील रहिवाशी नागरिकांना आहे. म्हणूनच त्या ऋणाच्या पोटी ‘दिबां'प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां'चेच नामकरण व्हावे यासाठी सुरु झालेल्या चळवळीत विक्रमी नोंद झालेल्या मानवी साखळी आंदोलनात शहरातील रहिवासी जनता मूळ स्थानिक ग्रामस्थांसमवेत रस्त्यावर उतरली. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलनाने देशातील भूमिपुत्रांमध्ये भूमीपुत्र हक्क आणि त्यांची ओळख यांची जाणीव निर्माण झाल्याचेही भगत यांनी मनोगतातून सांगितले.