तळोजा खारघर मधील बेशिस्त इको व रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी
नवी मुंबई : तळोजाकडुन खारघरच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावर रॅपिड ऍक्शन-102 समोरील चौकात ईको कार चालक आणि रिक्षा चालक प्रवाशी घेण्यासाठी आपली वाहने रस्त्यावर उभे करुन रस्ता अडवून धरत आहेत. त्यामुळे या चौकात वाहतुक कोंडी सदृष्य परिस्थीती निर्माण होऊन त्याचा फटका या मार्गावरुन जाणाऱया दुचाकी व इतर वाहनांना बसत आहे. त्यामुळे येथील चौकात रस्ता अडवून उभे राहणाऱया इको व रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरीकांकडुन करण्यात येत आहे.
खारघर पाठोपाठ तळोजा भागातील लोकसंख्येत झपाटÎाने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे या दोन्ही नोडमधील नागरीकांची येजा वाढली आहे. याचाच फायदा उचलत इको टॅक्सी व रिक्षा चालकांनी खारघर आणि तळोजा या नोडमधील प्रवाशांसाठी शेअर टॅक्सी आणि शेअर रिक्षा सुरु केल्या आहेत. हे इको टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडुन प्रवाशांना घेण्यासाठी भररस्त्यावर आपली वाहने उभी करुन इतर वाहनांना अडथळा निर्माण करण्यात येत आहे. तळोजाकडुन खारघरच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावर रॅपिड ऍक्शन-102 समोरील चौकात तर हे इको टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक ऐन सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास प्रवाशांना घेण्यासाठी दोन लेन अडवून ठेवत आहेत.
त्यामुळे इतर वाहनांना जाण्यासाठी एकच लेन शिल्लक राहत असल्याने दुचाकी व इतर वाहन चालकांना त्यातून मार्ग काढत आपले ठिकाण गाठावे लागत आहे. ऐन सकाळी कामावर जाणाऱयांची वर्दळ असताना हे इको चालक आणि रिक्षा चालक रस्त्यावर ठाण मांडून उभे राहत असून त्यांच्याकडे याबाबत जाब विचारल्यास ते दादागिरी करत असल्याने इतर वाहन चालक त्यांच्या नादाला न लागता, गुपचुप त्या वाहनांच्या गर्दीतून मार्गक्रमण करुन जात आहेत. सदर चौकात वाहतुक पोलीस उभे राहत नसल्यामुळे इको व रिक्षा चालक बेशिस्तपणे आपली वाहने उभी करुन रस्ता अडवून धरत असल्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यात स्थानिक नागरिकांमधुन व्यक्त करण्यात येत आहे.
या बेशिस्त इको व रिक्षांमुळे सदर चौकात वाहनांची गर्दी होऊन त्याचा विनाकारण फटका नागरीकांना बसत असल्याने या इको व रिक्षा चालकांविरोधात येथील नागरीकांमधुन दबक्या आवाजात तक्रारी करण्यात येत आहेत. तसेच वाहतुक पोलिसांनी या बेशिस्त इको व रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राकेश पाटील (घोट गाव खारघर)
तळोजा रॅपिड ऍक्षन-102 समोरी चौकात तळोजाकडुन खारघरच्या दिशेने जाणाऱया मार्गावर बेशिस्तपणे वाहने उभे करुन इतर वाहन चालकांना व नागरीकांना त्रास होईल असे कृत्य करणाऱया इको व रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी वाहतुक पोलिसांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.