दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची लवकरच गर्दीतून मुक्तता
डोंबिवली : मुंबईच्या दिशेने जाताना कल्याण डोंबिवली नंतर दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. दिवा रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणारे खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. सदर मागणीची दखल घेत ‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी बैठक घेऊन तसेच पत्रव्यवहार करीत पुलाच्या रुंदीकरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या पुलाच्या रुंदीकरणाच्या पूर्णत्वानंतर येथून जाणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.
दिवा रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी लोकलने मुंबई, कर्जत, कसारा, पनवेल, वसई येथे नियमित प्रवास करीत असतात. दिवा रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिवा रेल्वे स्थानकाचा कायापालट प्रकल्प राबविण्यात आला आहे. स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारणे, फलाटांचे रुंदीकरण आणि लांबी वाढविणे, शेडचे काम करणे यासारखी कामे करण्यात आली होती. स्थानकातील रेल्वे फाटकातून रुळ ओलांडल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी स्थानकात जाण्यासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी सरकते जिने देखील बसविण्यात आले आहे.
मुंबईच्या दिशेने असणारा आणि शहराच्या पूर्व भागाला जोडणारा पादचारी पुल अरुंद असल्याने प्रवाशांना कायमच गर्दीचा सामना करावा लागतो. दिवा शहरातील बहुतांश लोकवस्ती शहराच्या पूर्व भागात आहे. मुख्य बाजारपेठही शहराच्या पूर्व भागातच आहे. यामुळे या स्थानकात सकाळी आणि सायंकाळी बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती अनेकदा होते. याच पार्श्वभूमीवर येथील प्रवासी संघटनांकडून पुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्याची ‘मध्य रेल्वे'कडे आणि खासदार शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत खासदार शिंदे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी बैठक घेऊन तसेच पत्रव्यवहार करुन पुलाच्या रुंदीकरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारणीचे काम सुरु आहे. येत्या काही आठवड्याच्या कालावधीत सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर गर्डर टाकण्याचे काम पूर्णत्वास जाणार आहे. यामुळे नागरिकांना पुलावरुन जाताना गर्दीचा सामना करावा लागणार नसल्याने प्रवासी संघटनांकडून खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.
दिवा रेल्वे स्थानकातील अरुंद पादचारी पुलामुळे मोठी गर्दी होते. यासाठी सातत्याने ‘मध्य रेल्वे'कडे पाठपुरावा केला होता. खासदार शिंदे यांनी मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सदर काम मार्गी लावले. या पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीतून लवकरच मुक्तता मिळणार आहे.
- आदेश भगत, अध्यक्ष-दिवा रेल्वे प्रवासी संघटना.