..तर पालिकेविरोधात 'पेन, पेन्सिल डाऊन' आंदोलन
पाणीटंचाई प्रश्नावर आक्रमक भूमिका
नवी मुंबई : जनतेच्या समस्या सुटल्या नाही तर नवी मुंबई महापालिके विरोधात 'पेन, पेन्सिल डाऊन' आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या नियमित बैठकीमध्ये लोकनेते आमदार नाईक यांनी शहरातील पाणीटंचाईसह अन्य प्रश्नांवर अतिशय आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांप्रती उदासीन असलेल्या सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी सिडको विरोधात 80च्या दशकात ऐतिहासिक 'पेन, पेन्सिल डाऊन' आंदोलन पुकारून सिडको कार्यालयाचे कामकाज ठप्प केले होते. नवी मुंबई पालिकेतील काही स्वार्थी आणि मस्तवाल अधिकारी जनतेची कामे करीत नाहीत. त्यामुळे लोकशाही मार्गाने महापालिकेचे काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा...
काही स्वार्थी आणि भ्रष्ट प्रवृत्तीचे अधिकारी जनतेची कामे करीत नाहीत. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या घटकांच्या दबावाखाली येऊन अत्यावश्यक कामे देखील दीर्घकाळ प्रलंबित ठेवतात. आयुक्तांची देखील हे अधिकारी दिशाभूल करतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली.
पाणीटंचाईची तक्रार येता कामा नये...
सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई शहरात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असून पाणी वितरणातील त्रुटी तसेच पाण्याचा कमी दाब यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी तर आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो आहे. बारवी धरणातून नवी मुंबईला होणारा हक्काचा पाणीपुरवठा अर्धाच होतो आहे. पाणीचोरी देखील होते आहे. पालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही, असे स्पष्ट करीत नाईक यांनी पुढील पंधरा दिवसात जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर पुढच्या वेळेस पालिकेचे कामकाज बंद पाडू असा इशारा दिला.
प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करा...
नवी मुंबईतही हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. खासकरून खैरणे, पावणे, बोनकोडे, तुर्भे अशा सर्वच औद्योगिक विभागामध्ये हवा प्रदूषित असते परिणामी नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. योग्य प्रक्रिया न करता रासायनिक पाणी खाडीमध्ये आणि रासायनिक धूर हवेमध्ये सोडून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी केली.
नवी मुंबईच्या भविष्यकालीन जलसंपन्नतेसाठी योजना
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता पुढील पन्नास वर्षांमध्ये या लोकसंख्येला पुरेल इतका पाण्याचा साठा उपलब्ध करण्यासाठी नाईक यांनी टाटा हायड्रो पॉवरमधून पाण्याची उचल आणि भिरा पाणी प्रकल्प या दोन योजना सुचवल्या आहेत. त्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीची माहिती लोकनेते नाईक यांनी विचारली असता याबाबतीत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचे आयुक्त नार्वेकर म्हणाले.