‘राष्ट्रवादी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड

तुर्भे येथील पाटील घराण्यात दुसऱ्यांदा ‘राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष पद

नवी मुंबई : ‘नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या शरद पवार गटाची धुरा अखेर तुर्भे येथील माजी नगरसेवक तथा माथाडी नेते चंद्रकांत पाटील (सी.आर.पाटील) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पाटील घराण्यात दुसऱ्यांदा ‘राष्ट्रवादी काँग्रेस'चे जिल्हाध्यक्षपद आले आहे. यापूर्वी त्यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय डी. आर. पाटील ‘राष्ट्रवादी'च्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले नवी मुंबई जिल्हाध्यक्ष होते.

७ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नेते शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी'चे यापूर्वीचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी अजित पवार यांच्या सोबत जाणे पसंत केल्यानंतर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते.

चंद्रकांत पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि आगरी समाजाचे असल्यामुळे तसेच ते ‘माथाडी युनियन'मध्ये पूर्वीपासून सक्रिय असल्यामुळे या पदावर तेच प्रबळ दावेदार होते. यामुळे पक्षाला पहिल्यांदाच प्रकल्पग्रस्तांसह माथाडी कामगारांमध्ये प्रिय असलेली व्यक्ती अध्यक्षपदी मिळाली आहे.

‘राष्ट्रवादी'चे नेते शरद पवार यांचे धर्मनिरपेक्ष विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून शहरात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवितानाच नवी मुंबई मध्ये ‘महाविकास आघाडी'ला बळकटी देण्यावर आपला भर राहील. तसेच पक्ष नेतृत्वाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करु. - चंद्रकांत पाटील, नवनियुवत जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

..तर पालिकेविरोधात 'पेन, पेन्सिल डाऊन' आंदोलन