‘मनसे'च्या इशाऱ्याची दखल

तळोजा वसाहतीतील रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरुवात

खारघर : तळोजा वसाहती मधील रस्त्यांचे काम नित्कृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे दिवाळी पूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु न केल्यास सिडको विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी यांनी दिला होता. त्या इशाऱ्याची दखल घेऊन दिवाळी पूर्वी तळोजा वसाहती मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

तळोजा वसाहतीतील रस्त्यांचे मे महिना अखेरीस डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नित्कृष्ट दर्जाचे काम झाले. त्यामुळे यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसात रस्त्यावरील डांबरीकरण वाहून गेल्यामुळे पुन्हा रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. परिणामी नागरिकांना गणेशोत्सव खड्डयातच साजरा करावा लागला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिडकोकडून तळोजा फेज-१ आणि फेज-२ मधील मुख्य रस्त्यांवर डागडुजी करण्यात आली होती. मात्र, तळोजा फेज-१ आणि फेज-२ मधील बहुतांश भागातील रस्ते खड्डेमय दिसत असल्यामुळे ‘मनसे'चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी यांनी, दिवाळी पूर्वी तळोजा फेज-१ आणि फेज-२ मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु न झाल्यास मनसे तर्फे सिडको विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल तसेच यावेळी काही उचित प्रकार घडल्यास त्यास सिडको जबाबदार असेल, असा इशारा ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे दिला होता. त्या इशाऱ्याची दखल घेऊन ७ नोव्हेंबर पासून तळोजा वसाहतीतील रस्ते डांबरीकरण करण्याचे काम सुरु झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तळोजा वसाहत मधील रस्त्यांच्या कामासंदर्भात सिडकोकडे २ नोव्हेंबर रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेवून वस्तुस्थिती निदर्शनास आणून देताच ७ नोव्हेंबर रोजी दुपार नंतर तळोजा वसाहत मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. - प्रवीण दळवी, रायगड जिल्हा उपाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘राष्ट्रवादी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड