दिवाळे येथे श्री साई कला सर्कल ब्रास बँड प्रशिक्षण केंद्र, गजेबो गार्डनचे लोकार्पण

ग्रामस्थांकडून मासेमारी व्यवसायासोबतच कला टिकविण्याचे काम - आ. मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : दिवाळे गावातील कोळी बांधव गुण्या-गोविंदाने राहत असून आपले पारंपारिक सण-उत्सव साजरे करीत असतात. दिवाळे गावाला एक कलेचा सांस्कृतिक वारसा असून कला जोपासण्याचे काम दिवाळे कोळीवाड्यातील तरुण-तरुणींनी आणि नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून जोपासले आहे. याच अनुषंगाने दिवाळे गावात तरुण-तरुणींकरिता श्री साई कला सर्कल ब्रास बँड प्रशिक्षण केंद्र तसेच गजेबो गार्डन आणि सोलर या विकास कामांचा लोकार्पण नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

नवी मुंबई शहराचा विकासाबरोबर मूळ गावांचा विकास व्हावा आणि गावातील नागरिकांचा राहणीमान, दर्जा उंचावण्यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेला प्रयत्न खरच दिवाळे गाव ‘स्मार्ट व्हिलेज'च्या दिशेने जात आहे. तसेच राज्यभर दिवाळे गांव मच्छीसाठी प्रसिध्द आहे. तर ब्रास बँडमध्ये दिवाळे गाव उच्चस्थानी आहे. तसेच तरुण-तरुणींनी बँड वादक म्हणून प्रशिक्षण घेऊन आपली कला सादर करावी, असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी केले.

दिवाळे गावाने सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे काम गेली अनेक वर्षे केलेले आहे. या गावात पारंपारिक मासेमारी व्यवसाय असून त्यांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. तरीसुध्दा मासेमारी व्यवसायासोबतच कला टिकविण्याचे काम दिवाळे गावातील कोळी बांधव करीत आहेत. आज या दिवाळे कोळीवाड्यात छाया कला सर्कल ब्रास बँड, प्रेम सागर ब्रास बँड आणि श्री साई कला सर्कल ब्रास बँड अश्या या तीन कला ब्रास बँड पथकांनी आजपर्यंत कलेचा वारसा जोपासण्याचे काम केल आहे. तसेच या कलेला प्रभावित होऊन अनेक तरुण-तरुणी या कला क्षेत्रात प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षीतांना योग्य त्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच दिवाळे गावातून असे अनेक कलाकार तयार होण्यासाठी माझ्या विकास निधीमधून श्री साई कला सर्कल ब्रास बँड प्रशिक्षण केंद्राची वास्तू उभारुन दिली आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

तरुण पिढी शिक्षणाच्या दिशेने पुढे चाललेली आहे. शिक्षण घेत असताना तरुण पिढीचा सांस्कृतिक कलेचा स्तर उंचावण्यासाठी दिवाळे गावात माझ्या संकल्पनेतून संपूर्ण स्थानिक कोळी बांधवांच्या साक्षीने श्री साई कला सर्कल ब्रास बँड प्रशिक्षण केंद्र या वास्तूचे लोकापर्ण होत आहे. तसेच अजून काही दिवाळे गावात विकास कामे प्रगती पथावर असून लवकरात लवकर त्यांचेही लोकार्पण होणार आहेत. नवी मुंबईतील नागरिकांच्या आणि कोळी बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरच पूर्णत्वास नेल्या जातील.
श्री साई कला सर्कल ब्रास बँड प्रशिक्षण केंद्राची वास्तू उभारण्यात आणि अशा अनेक विकास कामात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी जाहीर आभार मानले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक भरत जाधव, दत्ता घंगाळे, दिवाळे गावातील जेष्ठ संगीत मास्तर दत्ता कोळी, ‘श्री साई कला ब्रास बँड'चे अध्यक्ष अक्षय कोळी, ‘जेष्ठ नागरिक संस्था'चे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, ‘डोलकर मच्छीमार संस्था'चे तुकाराम कोळी, ‘फगेवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष अनंता बोस, ‘एकविरा मच्छीमार
संस्था'च्या अध्यक्षा सुरेखा कोळी, ‘छाया कला ब्रास बँड'चे सभासद घनश्याम कोळी, प्रेम सागर ब्रास बँडचे सभासद नागेश कोळी, ‘नवी मुंबई ब्रास बँड युनियन'चे अध्यक्ष मनोज भोईर, उपाध्यक्ष जनार्दन वास्कर, ‘पोलीस ब्रास बँड'चे बाळासाहेब कांबळे, महापालिका शहर अभियंता संजय देसाई, उप-अभियंता अजय पाटील, कार्यकारी अभियंता संजीव पाटील, अरविंद शिंदे, उप-अभियंता स्वाती शिंदे, बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्यासह असंख्य संगीत कलाकार प्रेमी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘मनसे'च्या इशाऱ्याची दखल