सीवुडस्‌ मधील पाळणाघर खुले करण्यासाठी ‘मनसे'चे आंदोलन

८ डिसेंबर पर्यंत पाळणाघर सुरु न केल्यास तीव्र आंदोलन - शालिनी ठाकरे

नवी मुंबई : सीवुडस्‌ मधील बंद असलेले पाळणाघर सुरु करावे, यासाठी ‘मनसे'च्या नेत्या सौ. शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अंगाई गीत गावून आणि पाळणा हलवून ‘मनसे'तर्फे महापालिका विरोधात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, येत्या ८ डिसेंबर पर्यंत पाळणाघर सुरु करावे अन्यथा ‘मनसे'तर्फे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सौ. शालिनी ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

सीवूड्‌स, सेक्टर-४८ मध्ये महापालिकेच्या वतीने पाळणाघर बांधण्यात आले असून सदर वास्तू मागील ४ वर्षापासून धूळ खात पडली आहे. याबाबत ‘मनसे'ने वारंवार सदर वास्तू सर्वसामान्यांसाठी खुली व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन आंदोलन केले आहे. तरी महापालिका अधिकारी वारंवार खोटे आश्वासन देवून वेळ मारुन नेत आहेत. त्यामुळे या प्रकाराच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना'ने सौ. शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो बाळा जो जो रे... हे अंगाई गीत गावून आणि पाळणा हलवून ‘पाळणाघर'च्या बाहेर आंदोलन केले. यावेळी विभागातील महिलांनी महापालिकेच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

यानंतर ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त श्रीराम पवार यांची भेट घेवून त्यांना जाब विचारला. यावेळी उपायुक्त श्रीराम पवार यांनी कार्यवाही पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला. त्यावर सौ. शालिनी ठाकरे यांनी येत्या एक महिन्यात पाळणाघर चालू केले नाही तर याहून तीव्र आंदोलन केले जाईल, असे उपायुवत पवार यांना ठणकावून सांगितले. ‘मनसे महिला सेना'च्या शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, ‘मनसे'चे उप शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांनी उपायुक्त पवार यांना महापालिकेच्या कामातील दिरंगाई दाखवत पाळणाघर तात्काळ सुरु करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर उपायुवत उपायुक्त श्रीराम पवार यांनी ८ डिसेंबर पर्यंत पाळणाघर सुरु करु, असे आश्वासन ‘मनसे'च्या शिष्टमंडळाला दिले.

‘मनसे'च्या शिष्टमंडळात सौ. शालिनी ठाकरे यांच्यासह महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, उमेश गायकवाड, विभाग सचिव अप्पासाहेब जाधव, उपविभाग अध्यक्ष राजेंद्र खाडे, शाखा अध्यक्ष दिलीप पाटील, अखिल खरात, संदीप कांबळे, रोहित शिवतरे, सुनील शिंदे, मंगेश काळेबाग, प्रद्युम्न हेगडे, महिला सेनेच्या यशोदा खेडस्कर, रेखा आयवळे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 मुंबई सिनेट निवडणूक गोंधळ