‘दिबां'च्या जासईत पुन्हा सत्ता स्थापनेसाठी ‘इंडिया महाआघाडी'चे प्रयत्न

जासई ग्रामपंचायतीवर कोण बाजी मारणार?

उरण  :  लोकनेते ‘दिबां'चे जन्मगाव असलेल्या आणि वार्षिक पावणे दोन कोर्टींचे उत्पन्न असलेल्या जासई ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ‘इंडिया महाआघाडी'ने कंबर कसली आहे. तर स्वबळावर लढणाऱ्या ‘भाजपा'च्या उमेदवारांनी ‘इंडिया महाआघाडी'ला निवडणुकीत आव्हान दिले आहे. मात्र, नवख्या उमेदवारांवर मतदार कितपत विश्वास टाकतात, यावरच ‘भाजपा'चे निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.

लोकनेते ‘दिबां'च्या जन्मगावाबरोबर १९८४ साली देशभर गाजलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचेही जासई प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. संघर्षाचा इतिहास असलेल्या जासई ग्रामपंचायतीमध्ये ‘काँग्रेस'चा अपवाद वगळता ‘दिबां'च्या पाठीराख्यांनी शेकाप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षाकडे पंचायतीची सत्ता जाऊ दिलेली नाही. जासई ग्रामपंचायतीची लोकसंख्या १२ हजारांहून अधिक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील विविध कंटेनर यार्ड, कंपन्यांमुळे ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न पावणे दोन कोटींच्या घरात आहे. तसेच विविध आंदोलनांचे केंद्र म्हणूनही जासईची ओळख आहे. त्यामुळे वर्चस्वासाठी ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व असावे अशी प्रबळ इच्छा सर्वच राजकीय पक्षात असणे स्वाभाविकच आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां'चे नाव देण्यासाठी भाजपप्रणित केंद्र, राज्य सरकारने चालविलेल्या दिरंगाईमुळे जासई मधील मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे.

जासई ग्रामपंचायतीमध्ये सहा प्रभाग आहेत. या सहा प्रभागातून थेट सरपंच पदासह १६ सदस्य पदासाठी उद्या ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. थेट सरपंचाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे. तर प्रभाग क्रमांक-३ मधून ‘इंडिया महाआघाडी'च्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित १६ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक लढवित असल्याने महाआघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत होणार आहे. या मतदार संघात ४१८२ मतदार आहेत.

या निवडणुकीतही सरपंच पदासाठी ‘इंडिया महाआघाडी'नेे अनुभवी संतोष घरत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ‘भाजपा'चे नवखे बळीराम घरत यांच्यातच थेट लढत होणार आहे. ‘इंडिया महाआघाडी'साठी ‘शिवसेना'चे बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, ‘काँग्रेस'चे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, ‘शेकाप'चे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार सुरु आहे. तर ‘भाजपा'तर्फे माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचाराचा धुरा सांभाळली आहे.

विकासाच्या बळावर सरपंच पदासह सदस्यपदाच्या १७ जागांवर ‘इंडिया महाआघाडी'चे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास संतोष घरत यांनी व्यक्त केला आहे. तर सरपंच पदासह किमान १० सदस्य विजयी होऊन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करु, असा दावा ‘भाजपा'चे उमेदवार बळीराम घरत यांनी केला आहे. दरम्यान, या निवडणुकीत कोण बाजी मारतो? ते पाहणे आता महत्वाचे ठरेल. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पंतप्रधान यांना उद्‌घाटनासाठी वेळ मिळत नसल्यामुळे नवी मुंबईकरांची विनाकारण पिळवणूक