मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम जाहीर

ठाणे जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान एकूण १ लाख २९ हजार ३७२ मतदारांची वाढ

ठाणे : भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघाची एकत्रिकृत प्रारुप मतदारयादी जिल्हाधिकारी आणि ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे मध्यवर्ती कार्यालय, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये ५ जानेवारी ते २७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान एकूण १ लाख २९ हजार ३७२ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. यामध्ये पुरुष - ६५ हजार ६७२, स्त्री - ६३ हजार ६८१ आणि इतर १९ इतकी मतदार वाढ झालेली असून, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी पुरूष - ३४ लाख ३२ हजार ७९२, स्त्री- २९ लाख १० हजार, इतर- १ हजार ९७ अशी एकूण मतदारांची संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९ इतकी आहे.

मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणादरम्यान १३३ मतदान केंद्र नव्याने तयार करण्यात आलेले असून, त्यामध्ये ३६ मतदान केंद्र गृहनिर्माण सोयायटी मधील क्लब हाऊस हॉल मध्ये घेण्यात आलेली आहेत. ठाणे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या प्रमाणमध्ये एकूण ३ इतकी वाढ झालेली आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी महिला मतदारांचे प्रमाण - ८४५ होते. तर २७ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलांचे प्रमाण- ८४८ इतके झालेले आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार नोंदणीचे गुणोत्तर ६५.४० % इतके झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८-१९ वयोगटातील मतदारांमध्ये एकूण २९ हजार १२४ इतकी वाढ झालेली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी  १८-१९ वयोगटातील एकूण मतदार ७५ हजार २२३ इतके आहेत. ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदार नोंदणी मध्ये एकूण १ हजार २०६ इतकी वाढ झालेली आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ३३ हजार ३३८ इतके दिव्यांग मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ५७२ देह विक्रय करणाऱ्या महिला (इऐं) मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच ४ हजार ३३१ इतक्या असंरक्षित आदिवासी गटातील मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

६ जानेवारी २०२३ पासून ते २७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान एकत्रिकृत प्रारुप यादी प्रसिध्द होईपर्यंत ठाणे जिल्ह्यात एकूण १ लाख ७६ हजार २४० इतके नमुना अर्ज - ६, ७ आणि ८ एकत्रितरित्या प्राप्त झाले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घरोघरी भेटी देवून मतदारांच्या पडताळणी दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंदाजे १५ लाख १६ हजार ८५३ इतक्या घरांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत भेटी देण्यात आलेल्या आहेत. या भेटीदरम्यान एकूण मयत मतदार ४७ हजार ७०९ आणि एकूण कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार ४७ हजार ९३३ असल्याचे आढळून आलेले आहेत. या मयत आणि कायस्वरूपी स्थलांतरित मतदारांची सध्या सुरु असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या ११ ऑगस्ट २०२३ रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशाचे पालन करुन वगळणी करण्यात येणार आहे, असे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १८-१९ वयोगटातील मतदारांची नोंदणी, लक्षित घटकांची (तृतीय पंथी, एफएसडब्लू, पीव्हीटीजी, बेघर, दिव्यांग मतदार) मतदार नोंदणी, महिला मतदारांची नोंदणी विशेष करुन भिवंडी आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच इतर सर्व मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

दरम्यान, आगामी लोकसभा र्सावत्रिक निवडणूक २०२४ पूर्वीच्या या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सर्व मतदारांना केले आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
- दावे आणि हरकती स्विकारण्याची अंतिम तारीख - ९ डिसेंबर २०२३
- विशेष मोहिमांचा कालावधी - ४ नोव्हेंबर, ५ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर २०२३.
- दावे आणि हरकती निकालात काढण्याची तारीख - २६ डिसेंबर २०२३.
- मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी - ५ जानेवारी २०२४. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भंगार डेपोच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?