लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकासकामे वेळेत पूर्ण करा

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १ मार्च २०२४ नंतर केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी विकास कामे पूर्ण करणे तसेच प्रस्तावित काही कामांचे कार्यादेश होवून कामे सुरु करणे गरजेचे आहे. आचारसंहितेपूर्वीचा मर्यादित कालावधी लक्षात घेवून ठाणे शहरात सद्यस्थितीत सुरु असलेली रस्ते, शौचालय, शाळा इमारत दुरुस्ती तसेच शहर स्वच्छतेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामांच्या निविदा प्रसिध्द करुन सदरची कामे देखील फेब्रुवारी २०२४ पूर्वी सुरु करण्याचे नियोजन करावे. सदर सर्व कामांचा दर्जा गुणवत्तापूर्वक आणि अत्युच्च असेल याकडे लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला आणि सर्व कार्यकारी अभियंता यांना बैठकीत दिले आहेत.

शहरात हाती घेण्यात आलेली रस्त्यांची जी कामे पावसाळ्यादरम्यान थांबविण्यात आली होती, ती सर्व कामे आता सुरु करण्यात आलेली आहेत. त्याकरिता काही ठिकाणी वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करणे गरजेचे आहे, त्यामुळे काही कालावधीसाठी नागरिकांना असुविधा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर कामे अत्यंत प्राधान्याने आणि कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. जेणेकरुन नागरिकांना होणारी असुविधा मर्यादित कालावधीसाठी राहील. शहरातील सर्व रस्ते दोष निवारण कालावधीमधील रस्ते आणि दोष निवारण कालावधीव्यतिरिक्त असलेले रस्ते असे दोन श्रेणींमध्ये विभाजित करणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत दोष निवारण कालावधीतील रस्ता दुरूस्त करण्याची वेळ आली तर तो संबंधित कंत्राटदाराच्या खर्चानेच दुरूस्त करण्यात यावा, अशा सूचनाही आयुक्त बांगर यांनी या बैठकीत दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांची कामे आचारसंहितेपूर्वी किंबहुना कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सुरु असलेल्या दीपमाळांचे काम दिवाळीपूर्वी करुन घेण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, गडकरी रंगायतन, नाल्यावर जाळी बसविणे, टेमघर पाणी शुध्दीकरण केंद्रातील अत्यावश्यक कामे, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल आदि कामांची निविदा प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करुन कामाचे कार्यादेश लवकरात लवकर द्यावेत. कळवा येथील पाण्याचे जलकुंभ तीन टाक्या तसेच खारीगांव येथील एसटीपी प्लांट कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या.

घनकचरा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांपैकी रस्ते साफसफाईच्या कामाचे कार्यादेश होवून कामे सुरू करण्यात आलेली आहे. डोअर टू डोअर कलेक्शन, यांत्रिकी पध्दतीने रस्त्यांची साफसफाई, शौचालयांची स्वच्छता, कंटेनर टॉयलेटची निगा व देखभाल, दिवा डंपींग ग्राऊंड येथील जागा संपूर्णतः कचरामुक्त करण्यासाठी बायोमायनिंग प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या कामाचे कार्यादेश फेब्रुवारी महिन्यापूर्वी होवून प्रत्यक्षात काम सुरु होणे गरजेचे आहे. तसेच अमृत योजनेतंर्गत हाती घ्ोण्यात आलेल्या १६ तलावांची कामे मे २०२४ पर्यत पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या.

विद्युत विभागामार्फत संपूर्ण शहरभर जुने सोडियमवेपर दिवे बदलून नवीन एलईडी दिवे बसविण्याचे काम फेब्रुवारी २०२४ पूर्वी पूर्ण करावे. उद्यान विभागामार्फत दैनंदिन निगा देखभालीच्या निविदा काढावयाच्या आहेत. परंतु, सद्यस्थितीत सुरु असलेली निगा देखभालीची कामे असमाधानकारक असल्याचे दिसून येते. यासाठी या कामी निश्चित केलेल्या अटी-शर्तींमध्ये आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवीन उद्यान निर्मितीसाठी भांडवली खर्चातंर्गत शासनाकडून ६० कोटी रुपये शासनाकडून महापालिकेस प्राप्त झाले आहेत, याचाही आराखडा तयार करण्यात यावा. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचे काम केलेले आहे, ते उद्यान विभागाने हस्तांतरीत करुन घ्यावेत. जाहिरात कंत्राटदाराला जी कामे देण्यात आली होती ती अद्याप झालेली नसून यासंदर्भात संबंधित जाहिरात कंत्राटदारास नोटीस काढण्याच्या सूचनाही आयुवतांनी या बैठकीत दिल्या.

सदर बैठकीस उपायुक्त तुषार पवार, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे यांच्यासह प्रभाग समिती स्तरावरील सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

विविध विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा अत्यंत सुयोग्य पध्दतीने विनियोग होईल याकडे कटाक्ष असावा. जर प्रस्तावित कामे पूर्ण होवून निधी शिल्लक राहिल्यास उर्वरित निधी शासनाकडे पाठविला जाईल. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘मनसे'च्या टोलनाका देखरेख कक्षाला शर्मिला ठाकरे यांची भेट