उरण तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींची निवडणूक
शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी
उरण : उरण तालुक्यातील जासई, चिरनेर आणि दिघोडे या तीन महत्त्वाच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून येत्या ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ असल्याने तीनही ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक उमेदवारांनी आप आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरण नगरपरिषद येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या उरण तालुक्यातील चिरनेर, दिघोडे, जासई ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ५ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या तीन ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र मागविण्यासाठी १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत तारीख देण्यात आली आहे. तर नामनिर्देशन पत्राची छाननी २३ ऑक्टोबर रोजी ११ पासून ते छाननी संपेपर्यंत वेळ असणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत २५ ऑक्टोबर रोजी २ वाजेपर्यंत असणार आहे.
त्यामुळे सदर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटच्या दिवशी २० ऑक्टोबर रोजी तीनही ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक उमेदवारांनी आप आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरण नगरपरिषद येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात गर्दी केली होती. यावेळी आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, ‘भाजपा'चे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, निळकंठ घरत, प्रकाश ठाकूर, ‘शिवसेना'चे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, महिला नेत्या ज्योती सुरेश म्हात्रे, ‘काँग्रेस'चे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, मिलिंद पाडगांवकर, राजेंद्र भगत, अलंकार परदेशी, ‘शेकाप'चे तालुका चिटणीस विकास नाईक, ज्येष्ठ नेते नरेश घरत, सुरेश पाटील, सीमा घरत, ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, राकेश भोईर, विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर, अजित ठाकूर, राजेंद्र पाटील, दिनेश लाल धनगर, ‘राष्ट्रवादी'चे मनोज भगत, बहुजन नेते संतोष घरत यांच्या उपस्थितीत त्या त्या पक्षाच्या उमेदवारीनी थेट सरपंच पदासाठी आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत.