फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर

नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर मशाल मोर्चा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे नवी मुंबई शहरातील फेरीवाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी तसेच फेरीवाल्यांना न्याय हवक मिळवून देण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि ‘नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशन'चे अध्यक्ष तथा शिवसेना तुर्भे विभाग प्रमुख बाळकृष्ण खोपडे यांच्या नेतृत्वाखाली २० ऑवटोबर रोजी महापालिका मुख्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला होता.

नवी मुंबई शहरात सुमारे दहा हजार पेक्षा अधिक फेरीवाले असून, नवी मुंबई महापालिका प्रशासनाने २०१७ साली ७३२६ फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले आहे. तसेच दहा हजार पेक्षा अधिक फेरीवाल्यांना २०२० नंतर महापालिका प्रशासनाने शिफारस पत्र देऊन पहिला टप्पा १० हजार, दुसरा टप्पा २० हजार रुपये तर काही फेरीवाल्यांना ५० हजार रुपये कर्ज पी. एम. स्वनिधी योजना मधून दिले आहे. स्वानिधी कडून समृध्दी कडे योजना केन्द्र तथा राज्य सरकार आणि महापालिका राबवते तर दुसरीकडे नवी मुंबई शहरात फेरीवाल्यांवर महापालिका अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येते. या अन्याय विरोधात २० ऑवटोबर रोजी शिवसेना (उबाठा) तुर्भे विभाग प्रमुख आणि ‘नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशन'चे अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांच्या नेतृत्वाखाली  फेरीवाल्यांचा मशाल मोर्चा बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर काढण्यात आला होता. या मोर्चात नवी मुंबई मधील शेकडो फेरीवाले सहभागी झाले होते.

या मोर्चाची दखल घेऊन महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. ‘यापुढे सणासुदीच्या दिवसांमध्ये फेरीवाल्यांवर महापालिकाकडून कारवाई होणार नाही. तसेच तुर्भे विभागातील अतिक्रमण विभाग अधिकारी हेमचंद्र पाटील, संदीप औटी आदी फेरीवाल्यांसह महिलांशी उध्दट वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल', असे आश्वासन महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांनी चर्चेत बाळकृष्ण खोपडे यांना दिले.

यावेळी फेरीवाले प्रतिनिधी इस्माईल शेख, सहनाज सैयद, शाखा प्रमुख दत्तात्राय दिवाणे आदी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिघोडे ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारी अर्ज दाखल