वाशी टोल नाक्यावर ‘मनसेे'चे सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

सीवुडस्‌ मधील वाहन मॉनिटरींग रुमचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी मुंबई : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वाशी टोल नाक्यावर १२ मार्गिकांवर १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही मधील वाहनांची मोजणी करण्यासाठी मॉनिटरिंग रुम ‘मनसेे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवुडस्‌ मध्ये सुरु केली आहे. वाशी टोलनाक्यावरील सर्व वाहनांची मोजणी २० ऑवटोबर रोजी सकाळी ८ पासून सुरु करण्यात आली आहे. येथे पुढचे १५ दिवस २४ तास ‘मनसेे'चे कार्यकर्ते वाहनांची मोजणी करणार आहेत. त्या संदर्भातील एक तक्ता बनवण्यात आला आहे. कोणत्या प्रकारचे वाहन टोल नाक्यावरुन गेले याची नोंद या तक्त्यामध्ये ठेवत आहेत. १५ दिवसानंतर सदरची सर्व माहिती राज ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार आहे, असे गजानन काळे यांनी सांगितले.

दरम्यान, सीवुडस्‌ मध्ये बनवण्यात आलेल्या मॉनिटरींग रुमचे उद्‌घाटन ‘मनसेे'चे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळा नांदगांवकर आणि नितीन सरदेसाई यांनी वाहन मोजणी कशी होते ते नीटपणे समजून घेतले. ‘मनसेे'च्या या वाहन मोजणी मुळे टोल मधून होणारी खरी वसुली समोर येईल. याची दखल सरकार आणि टोल कंत्राटदारांना सुध्दा घ्यावी लागेल. तसेच टोल कंत्राटदारांना अजून जनतेला फसवता येणार नाही, असे बाळा नांदगावकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सदर उद्‌घाटन प्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, महापालिका कर्मचारी सेना शहर संघटक अप्पासाहेब कौठुळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, मनसे विभाग अध्यक्ष अमोल आयवले, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, सुहास मिंडे, अभिलेश दंडवते, सागर विचारे आणि मोठ्या संख्येने ‘मनसेे'चे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर