‘भाजपा'च्या महाविजय अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार - चंद्रशेखर बावनकुळे

नवी मुंबई : देशातील १४० कोटी जनतेला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी हवे असून तेच २०२४ मध्ये पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा पुन्हा शपथ घेतील, असा विश्वास ‘भारतीय जनता पार्टी'चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

‘भाजपा'च्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात ‘महाविजय-२०२४' अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरु आहे. आगामी निवडणुकीसाठी ‘भाजपा'ने राष्ट्रीय पातळीवर ४०० पेक्षा जास्त तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघाचा कार्यक्रम संकल्प दौरा १७ ऑवटोबर रोजी संपन्न झाला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘महाविजय अभियान'च्या सांगता प्रसंगी वाशीतील एमजीएम कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या चौक सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जनतेला आवाहन करताना भारताला जगातील सर्वोत्तम देश बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी भव्य राम मंदिराचे निर्माण केले. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर करुन त्यांचा सन्मान केला, असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी देश एकसंघ करण्याचे काम केले. काश्मीर मधील ३७० कलम हटवले. काश्मीरमध्ये कधीही तिरंगा फडकला नव्हता, त्या ठिकाणी तिरंगा फडकला. नवी मुंबईमध्ये ‘संपर्क से समर्थन अभियान'मध्ये नागरिकांनी मोदी यांना समर्थन दिले.२०२४ मध्ये जोपर्यंत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ठाणे लोकसभेमधून ‘महायुती'चा उमेदवार प्रचंड मतांनी विजय होऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी समर्थन देण्यासाठी संसदेमध्ये उपस्थित असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महा विजयाचा केलेला संकल्प पूर्णत्वास जाईल, असा विश्वास केला. लोकसभा विधानसभा आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविजय प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. तर ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या आवाहनानुसार नवी मुंबईतील दहा हजार राम भक्तांना अयोध्या दर्शन घडविण्याचे जाहीर केले.

याप्रसंगी आमदार रमेश पाटील, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, ठाणे लोकसभा निवडणूक प्रमुख विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे लोकसभा निवडणूक प्रमुख विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास योजना संयोजक संजय बाळा भेगडे, ठाणे लोकसभा समन्वयक जयप्रकाश ठाकूर, ठाणे विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ठाणे लोकसभा विस्तारक दीपक जाधव, बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह ‘भाजपा'चे पदाधिकारी-कार्यकतेे, इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नवी मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. वाशीतील मराठा भवन येथून घर घर संपर्क रॅलीचा शुभारंभ झाला. या पदयात्रेमध्ये २०२४ च्या महा विजय संकल्प साठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समर्थन देण्याचे आवाहन नागरिकांना केले. ऐरोली आणि बेलापूर विधानसभा सुपर वॉरिअरची बैठक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेतील महाविजय साकारण्यासाठी उपस्थित वॉरिअर्सना महत्त्वाच्या सूचना केल्या. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाशी टोल नाक्यावर ‘मनसेे'चे सीसीटीव्ही कॅमेरे तैनात