कायम, ठोक, कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी

कायम कर्मचाऱ्यांना ३५ हजार, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे- सावंत

नवी मुंबई : महापालिका आस्थापनेवरील कायम, ठोक तसेच कंत्राटी संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. १७ ऑवटोबर रोजी महापालिका मुख्यालयात कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या माध्यमातून कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नार्वेकर यांची भेट घेतली. त्यावेळी रविंद्र सावंत यांच्यासह शिष्टमंडळातील सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या आयुक्तांसमोर विस्तृतपणे मांडल्या.

दिवाळी सण आता जेमतेम सव्वा महिन्यावर आला आहे. दिवाळी म्हटल्यावर शासकीय अथवा खासगी आस्थापनेतील कर्मचारी तसेच अधिकारी बोनसची आतुरतेने वाट पाहत असतात. वाढत्या महागाईत घरातील दिवाळीचा फराळ, मुलांसाठी कपडे, फटाके आणि अन्य खरेदी अशा अनेक कारणासाठी बोनस त्यांच्या अर्थकारणाला हातभार लावत असतो. नवी मुंबई महापालिकेला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे सातत्याने केंद्र आणि राज्य स्तरावर सातत्याने पुरस्कार मिळत आहे. महापालिकेचा आणि शहराचा नावलौकीक वाढत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत काम करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान प्रशासनाने लवकर जाहीर करुन या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी रविंद्र सावंत यावेळी केली.

रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना देखील सानुग्रह अनुदान जाहिर करण्याची मागणी केली. ठोक मानधनावरील एका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ करताना त्यांचे वेतन ३५ हजार रुपये करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिक्षणासारख्या क्षेत्रात शिकविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना अवघ्या १ ते २ हजार रुपयांची तुटपुंजी वेतनवाढ करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. शिक्षकांची झालेली तुटपुंजी वेतनवाढ आम्हाला अमान्य असून अन्यायकारक आहे. याशिवाय अन्य सर्वच आस्थापनेतील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी आणि समस्या निवारणासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीस सुरूवात न झाल्याने ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याही कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत आणि त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत संबंधितांना निर्देश देवून या कामगार, कर्मचाऱ्यांची आजवर होत असलेली ससेहोलपट संपुष्ठात आणावी, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे यावेळी केली.

सदर बैठकीत रोहन कोकाटे यांनी अग्निशमन विभागाच्या समस्या मांडल्या. सुनिता अपाले यांनी महापालिकेतील परिचारिकांच्या समस्या मांडल्या. परिचारिकांना गेल्या १० ते २० वर्षात आश्वासित योजनेचा लाभ भेटला नसल्याची बाब अपाले यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी लवकरात लवकर सदर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन कामगार नेते रविंद्र सावंत आणि शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांना दिले.

महापालिका आस्थापनेत विविध संवर्गातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी तसेच परिवहन उपक्रमातील वाहक, चालक आणि शिक्षण विभागातील शिक्षकांच्या वेतनवाढीसाठी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या माध्यमातून ऑगस्ट क्रांतीदिनी ९ ऑगस्ट २०२३ रोजी महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले होते. पण, प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या समस्या ३१ ऑगस्टच्या आत सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही उपोषण आंदोलन स्थगित केले होते. परंतु, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाला आता दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटून देखील समस्या निवारणासाठी तसेच वेतनवाढीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून सुरु झाली नसल्याची खंत आहे. - रविंद्र सावंत, कामगार नेते तथा अध्यक्ष - महाराष्ट्र कर्मचारी युनियन.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘भाजपा'च्या महाविजय अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद