‘माडभुवन वाडी'चे लवकरच पुनर्वसन

पाताळगंगा एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना मिळणार पीएपी भूखंड

पनवेल : पनवेल तालुक्यातील माडभुवनवाडी, गुळसुंदे डोंगरीची वाडी आणि खालापूर तालुक्यातील ताडवाडी, गारभट, चांगवाडी या उरण विधानसभा मतदारसंघातील पाच दरडग्रस्त आदीवासी वाडी पुनर्वसनाबाबत आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथील मुक्तागिरी निवासस्थानी बैठक पार पडली.

या बैठकीला ‘एमआयडीसी'चे मुख्य अधिकारी मलिकणेर, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, पेण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इर्शाळवाडी दुःखद घटनेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करुन रायगड जिल्ह्यामधील पुनर्वसन करणे गरजेचे असलेल्या वाड्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे, असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने उरण विधानसभा क्षेत्रातील धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन करण्याची पुनर्मागणी आमदार महेश बालदी यांनी यावेळी केली तसेच दरडग्रस्त वाड्यांची सविस्तर माहिती दिली. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या वाड्या दरडग्रस्त असून, या वाड्यांचे वेळेत  पुनर्वसन केले नाही तर यातील काही वाड्यांची इर्शाळवाडी सारखी स्थिती होऊ शकते, अशी बाब आमदार महेश बालदी यांनी यावेळी ना. उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ना. उदय सामंत यांनी पनवेल तालुक्यातील माडभुवन वाडीचे ‘पाताळगंगा एमआयडीसी'च्या जागेत पुनर्वसन करण्यास मंजुरी देण्यात दिली असून प्रत्येक घराच्या बांधणीसाठी २.५ गुंठे भूखंड सिडको मार्फत विकसित करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित वाड्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे ना. उदय सामंत यांनी मान्य केले. याशिवाय पाताळगंगा आणि अतिरिवत पाताळगंगा एमआयडीसी मधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पीएपी भूखंड मिळण्याच्या, आमदार महेश बालदी यांच्या मागणीला ना. उदय सामंत यांनी तात्काळ मंजुरी देऊन संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या निर्णयाचा फायदा अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना होणार आहे. या बैठकीला खालापूर तालुका भाजपाध्यक्ष प्रवीण मोरे, माजी राजिप सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच विजय मिरकुटे, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत आदी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘शिवसेना'च्या ‘होऊ दे चर्चा' अभियानाला उरणकरांचा प्रतिसाद