सी-लिंक बाधित मच्छीमारांना दिवाळी भेट

आ. मंदाताई म्हात्रे यांचा मच्छीमार बांधवांतर्फे जाहीर सत्कार

नवी मुंबई : ‘एमएमआरडीए'तर्फे उभारण्यात येत असलेल्या न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, सारसोळे, वाशी, ऐरोली येथील मच्छीमार बांधवांना ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाईची ५ कोटी ५६ लाख रुपयांची रवकम थेट मच्छीमार बांधवांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्याच अनुषंगाने न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांच्या वतीने ९ ऑवटोबर रोजी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

सीबीडी येथील वारकरी भवन येथे आयोजित सदर सत्कार सोहळ्याप्रसंगी ‘कोळी महासंघ'चे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, डॉ. राजेश पाटील, बलबीर सिंग, ‘फगेवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष अनंता बोस यांच्यासह इतर मच्छीमार संस्थांचे अध्यक्ष तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यासंदर्भात ‘एमएमआरडीए'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पहिला हप्ता प्राप्त झालेल्या (८३) मच्छीमार बांधवांना दुसरा हप्ता म्हणून प्रत्येकी १ लाख ३४ हजार रुपये आणि नव्याने पात्र झालेल्या (१३२) मच्छीमार बांधवांना पहिला आणि दुसरा हप्ता म्हणून प्रत्येकी ३ लाख ३७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. सद्यस्थितीत दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, ऐरोली येथील एकूण २१५ मच्छीमार बांधवांना पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता अशी एकूणच सर्वांना एक रवकमी नुकसान भरपाई ५ कोटी ५६ लाख रुपये डी.बी.टी. द्वारे थेट प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांच्या बँक खात्यात जमा झाली आहे, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली. उर्वरित ज्या मच्छीमार बांधवांची कागदपत्रांअभावी प्रक्रिया अपूर्ण आहे, ती लवकरात लवकर पूर्ण करुन त्यांनाही नुकसान भरपाई मिळवून देणार आहे.

 न्हावा-शेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी गेली चार वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत होती. दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, ऐरोली गांव येथील कोळी बांधव मासेमारी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. म्हणून येथील मच्छीमार, कोळी बांधवांना संकटातून बाहेर काढणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘माडभुवन वाडी'चे लवकरच पुनर्वसन