दसऱ्यापर्यंत आरटीओ कार्यालयाचे लोकार्पण करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चा अल्टीमेटम
नवी मुंबई : नेरुळ पूर्व भागात सेवटर-१९ परिसरात नवी मुंबई उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाची वास्तू आणि टेस्टींग ग्राऊंड तयार करण्यात आले आहे. या सुसज्ज आरटीओ कार्यालयाची वास्तू उभी राहून बराच कालावधी लोटून गेला तरीही शासनाला या कार्यालयाचे लोकार्पण करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे या नवीन आरटीओ कार्यालयाचे लवकरात लवकर उद्घाटन करा अन्यथा जनहितासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात येईल, असा इशारा ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रववत तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, अशाच आशयाचे निवेदन रविंद्र सावंत यांनी ‘नवी मुंबई'च्या उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना दिले आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई डेप्युटी आरटीओ कार्यालयाचा कारभार ‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या धान्य मार्केट आवारातील काही गाळ्यांमधून चालविला जात आहे. दुसरीकडे महत्प्रयासानंतर नवी मुंबई उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नवीन वास्तू नेरुळ पूर्वे येथे उभारण्यात आली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यापासून सुसज्ज अवस्थेत असलेली सदर आरटीओ कार्यालयाची वास्तू उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.
या ठिकाणी ‘आरटीओ'चे कार्यालय कार्यान्वित झाल्यास बेलापूर, सीवुडस्, करावे, दारावे, शिरवणे, सानपाडा, कुकशेत, नेरुळ पूर्व आणि पश्चिम परिसर, सारसोळे, जुईनगर, आदि भागातील वाहन चालकांना एपीएमसी आवारात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. येथील नागरिकांना ‘आरटीओ'च्या कामासाठी परिसरापासून जवळच आरटीओ कार्यालय उपलब्ध आहे. आरटीओ कार्यालय बांधून तयार असतानाही उद्घाटनासाठी विलंब करणे योग्य नाही, असे रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
त्यामुळे नुतन नवी मुंबई आरटीओ कार्यालयाचे शासनाने दसरा सणाच्या आधी उद्घाटन करुन ते नागरिकांच्या सोयीसाठी सुुरु करावे. अन्यथा प्रशासनाने आरटीओ कार्यालयाच्या उद्घाटनाबाबतचा केलेला वेळकाढूपणा सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच कार्यालयाच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने स्थानिकांचा रोष आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी सदर आरटीओ कार्यालयाचे दसऱ्याच्या शुभमूहूर्तावर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रतिकात्मक उद्घाटन केले जाईल. यातून होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा रविंद्र सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तसेच त्यांनी त्याबाबत ‘नवी मुंबई'च्या डेप्युटी आरटीओ हेमांगिनी पाटील यांनाही निवेदन दिले आहे.
एकतर दसऱ्या पर्यंत नवी मुंबई आरटीओ कार्यालयाच्या नवीन वास्तुचे लोर्कापण करा; अन्यथा दसऱ्याच्या शुभदिनी काँग्रेस पक्षाकडून या कार्यालयाचे आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिकात्मक स्वरुपात उद्घाटन करु, असा इशारा निवेदनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. - रविंद्र सावंत, प्रववते-नवी मुंबई जिल्हा काँग्रेस.