आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून ‘सेंट्रल लायब्ररी' प्रकल्पाची पाहणी

सानपाडा कॉस्मोपॉलिटिन विभाग असल्याने येथे ‘सेंट्रल लायब्ररी'ची गरज

नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुख सुविधा अनुभवयास मिळतात. त्याअनुषंगाने ‘सिडको'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या माध्यमातून सानपाडा, सेवटर-११ मधील भूखंड क्र.१ येथे सेंट्रल लायब्ररी उभारण्यात येत आहे. या लायब्ररी प्रकल्पाची आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी १३ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपअभियंता विवेक मुलीये, कनिष्ठ अभियंता अविनाश यादव उपस्थित होते.

सानपाडा येथील स्थानिकांची आमच्या विभागात सेंट्रल लायब्ररी व्हावी अशी मागणी होती. त्यानुसार ‘सिडको'कडून सानपाडा, सेवटर-११ मधील भूखंड क्र.१ असा १७७०.७३ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड वितरीत करण्यात आला आहे. या भूखंडावर महापालिका ‘सेंट्रल लायब्ररी'ची उभारणी करत आहे. सदर वास्तू  बेसमेंट, तळमजला अधिक चार मजली असणार आहे. त्याचबरोबर या ‘सेंट्रल लायब्ररी'मध्ये पुस्तकांप्रमाणेच आधुनिक काळाला साजेशा ऑडीओ बुक्स, ई-लायब्ररी संकल्पनेचा अंतर्भाव, पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डींग, रँम्पवर व्हयुईंग गॅलरीची आकर्षण रचना, पुस्तकाचा प्रवास दर्शविणारा लक्षवेधी प्रदर्शन, लँग्वेज लॅब तसेच ग्रंथ विषयक उपक्रमांकरिता १३० आसनक्षमतेचे अद्ययावत सभागृह, दृष्टीहीन वाचकांसाठी ब्रेल विभाग तसेच मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील वाचनीय साहित्यकृती उपलब्धता असणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

सानपाडा कॉस्मोपॉलिटिन विभाग असल्यामुळे या विभागात ‘सेंट्रल लायब्ररी' होणे गरजेचे असून आज या कामाचा आढावा दौऱ्याच्या अनुषंगाने घेण्यात आला. सानपाडा मधील ‘सेंट्रल लायब्ररी'चा फायदा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पुस्तक वाचकांना विशेषत्वाने होणार आहे. माझे माझ्या प्रत्येक विकास कामांवर लक्ष असते. त्याचा आढावा मी नियमित घेत असते. तसेच येथील काही स्थानिकांना उद्यान, खेळाचे मैदान अशा विविध समस्या असून त्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा समवेत समाजसेवक पांडुरंग आमले, जगन्नाथ जगताप, निलेश वर्पे, चिंतामण बेल्हेकर, रुपेश मढवी, अशोक विधाते, नाना शिंदे, मारुती माने, जयराम खरात, श्रीपाद पत्की, दिशा केणी, स्वाती कदम, सुलोचना निंबाळकर, मोकल ताई, विश्वास बोराडे, पोपट गोडे, मंदार शेलार यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका