‘गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार'चा शुभारंभ

देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती असलेले प्रवेशद्वाराची उत्तम रितीने उभारणी -आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील किल्ले गांवठाण येथील गोवर्धनी माता मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पामबीच नजिक उभारण्यात आलेल्या आकर्षक आई गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वाराचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते १ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. याप्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त सोमनाथ पोटरे, डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, सहा. आयुक्त शशीकांत तांडेल, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, रामचंद्र घरत, अशोक गुरखे, सौ. नेत्रा शिर्के, दिपक पवार, सुनिल पाटील, ‘भाजपा'चे बेलापूर मतदारसंघ संयोजक निलेश म्हात्रे, जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, पाशाभाई, ‘गोवर्धनी माता मंदिर ट्रस्ट'चे विश्वस्त ॲड. विनोद सोनटक्के आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईला ऐतिहासिक परंपरा असून यामध्ये मूळच्या बेलापूर पट्टीचे श्रध्दास्थान असलेली आणि बेलापूर गांव तसेच परिसरातील अनेकांची कुलदेवता असलेली आई गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रौत्सव आणि अनेक कार्यक्रम आयोजन करण्याचे भाग्य मला मिळत आहे. श्री गोवर्धनी माता मंदिराकडे जाताना भाविकांच्या मनात भक्तीभाव उत्पन्न करणारे आणि देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती असलेले भव्यतम प्रवेशद्वार आपल्या संकल्पनेतून अत्यंत उत्तम रितीने साकारण्यात आल्याबद्दल आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आनंद व्यक्त केला.
नवी मुंबईच्या नावलौकिकाला साजेसा आणि चिमाजी अप्पांपासूनच्या ३०० हून अधिक वर्षांच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या आई गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वाराचा शुभारंभ करण्याचा योग लाभला. आज माझ्यासाठी आनंदाचा क्षण असून इतर प्रवेशद्वारांपेक्षा सदरचे अत्यंत आगळेवेगळे आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणारे प्रवेशद्वार देवदेवतांच्या लक्षवेधी मूर्तींमुळे पाहता क्षणी मनात भक्तीभाव निर्माण करते अशा शब्दात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या कार्यालयाच्या दालनातून दिसणाऱ्या या प्रवेशद्वारामुळे देवतांचे नियमित दर्शन होईल. तसेच ऊर्जास्थान असणाऱ्या गोवर्धनी मातेची नजरही आपल्यावर राहील, असे आयुक्त नार्वेकर म्हणाले.
नवी मुंबईचा क्विन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गानजिक महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक वास्तूसमोर राम, लक्ष्मण, सिता, हनुमान, शंकर, पार्वती, गणेश, विष्णू, श्रीकृष्ण, गरुड, हत्ती, शंख, चक्र अशा देवदेवतांच्या आणि प्रतिक चिन्हांच्या मूर्ती असलेले सदरचे भव्यतम आणि आकर्षक प्रवेशद्वार पाहता क्षणी लक्ष वेधून घेते. रस्त्यापासून ६ मीटर उंच आणि १२.५ मीटर लांब असणाऱ्या या प्रवेशद्वारामुळे या परिसराच्या सौंदर्यातही लक्षणीय भर पडलेली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २९ गावांची ओळख जतन होण्याकरिता ठिकठिकाणी प्रवेशद्वारांची निर्मिती करण्यात येत आहे. गोवर्धनी माता मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दाक्षिणात्य शैलीच्या मंदिराला अनुरुप असे अतिशय सुंदर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मदुराई येथील शिल्पचित्रकारांनी या प्रवेशद्वार निर्मितीमध्ये कला योगदान दिले आहे. या प्रवेशद्वारामुळे गोवर्धनी माता मंदिर याठिकाणी आहे, तेे सहजपणे कळेल आणि भाविकांना शोधत बसावे लागणार नाही. - आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

जुईनगर येथे मनसे चोर दहीहंडी साजरी