सीवुडस्‌ मध्ये नवीन मतदार नोंदणी-दुरुस्ती शिबीर संपन्न

नवीन मतदार नोंदणी-दुरुस्ती शिबीराचे बेलापूर विधानसभा मतदारसंघात आयोजन - आ. मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघात सीवुडस्‌ येथील गौरव महाविद्यालय मध्ये नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका कविता जाधव, रणजीत निंबाळकर, आदित्य जाधव, अभि कदम, विनायक गिरी, अज्यू कदम, मयूर कल्युड, प्रसाद ठाकूर तसेच ‘भाजपा'चे इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतात निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. याच अनुषंगाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे अशा तरुण युवक-युवती यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून सीवुडस्‌ मध्ये नवीन मतदार नोंदणी-दुरुस्ती शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच या शिबिराच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थींनी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या मतदार ओळखपत्रामधील नावामध्ये, पत्यामध्ये बदल झाले आहेत ते सुधारुन देण्याचे काम शिबिरामध्ये करण्यात आले. ज्या नागरिकांना मतदानाचा अधिकार असून सुध्दा त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशा नागरिकांना मतदानापासून वंचित राहू नये याकरिता त्यांचीही नाव नोंदणी केली जाणार आहे. तसेच मतदानाच्या कार्डामध्ये काही त्रुटी असतील त्याही सोडविण्याचे काम या शिबिराद्वारे झाल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. सदर नवीन मतदार नोंदणी-दुरुस्ती शिबीराचे आयोजन पूर्णतः बेलापूर विधानसभा मतदारसंघात विभाग निहाय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

कुठल्याही नागरिकांचा मतदानाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तसेच आपल्या देशात लोकशाही संपूर्ण जगात भक्कम आणि यशस्वी असल्याचे ‘भारत निवडणूक आयोग'ने दाखवून दिलेले आहे. देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे म्हणून शिबीरस्थळी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी करुन घेतली. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

न्यायासाठी स्विकारले ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे सदस्यत्व