गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण, महामार्ग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

नवीन पनवेल : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन करुन महामार्गावरील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केले. यावेळी ‘मनसे'च्या कार्यकर्त्यांनी टी-पॉईंट जवळील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण, तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी ५० हुन अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १६ ऑगस्ट रोजी पनवेल येथील मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसेच १७ वर्ष रखडलेल्या या महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल केंद्र आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी ‘मनसे'कडून वेगवेगळ्या स्वरुपाचे आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी ‘मनसे'च्या कार्यकर्त्यांनी शिरढोण जवळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. तर दुसरीकडे टी-पॉइंट जवळील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात ‘मनसे'च्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ‘मनसे'च्या कार्यकर्त्यांची धरपकड करुन अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

‘मनसे'चे महानगर प्रमुख योगेश चिले यांच्यासह इतर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सानपाडा येथे ‘नवीन मतदार नोंदणी अभियान'चे आयोजन