पनवेल महापालिकेचे ३८७३.८६ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर

पनवेल : पनवेल महापालिकेचे सन २०२५-२०२६ चे ३८७३ कोटी ८६ लाखाचे वस्तुनिष्ठ, विकासाभिमुख आणि कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक २५ मुख्य लेखा-वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्याकडे सुपूर्द  केले. महापालिकेच्या या अंदाजपत्रकांमध्ये महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधाबरोबरच  गतिमान प्रशासनासाठी  विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पामध्ये महापालिकेच्या प्रस्तावित बांधकाम विभागाच्या कामांमध्ये स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत (१५८ कोटी) कोटी, महापौर निवासस्थान-नवीन प्रभाग कार्यालये बांधणे (३८ कोटी), रस्त्यांचे कॉक्रिटीकरण-डांबरीकरण (४३७ कोटी),  क्रीडांगणे (५७ कोटी) प्रस्तावित करण्यात आले आहे. खारघर येथे नगरवाचन मंदिर आणि नाट्यगृह-वाचनालय बांधण्यासाठी १४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर माता रमाबाई आंबेडकर भवन, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह यासाठी भरीव तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

पनवेल शहरात गाढी नदीलगत पूर प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि पंपिग स्टेशन उभारणीसाठी १७.५० कोटी, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली नोड मधील होल्डींग पॉड (धारण तलाव) येथील गाळ काढणे आणि इतर अनुषांगिक उपाय योजना करण्यासाठी ३५ कोटी, सिडको प्राधिकरणासोबत कचऱ्यापासून उर्जा निर्मिती प्रकल्पासाठी १० कोटी, घनकचरा संकलन, वाहतूक आणि मनुष्यबळ इतर कामांसाठी २२१ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

नागरिकांना वैद्यकीय व आरोग्य सेवा पुरविण्यावर महापालिका कायमच भर देत आली असून यासाठी यावर्षी १२६ कोटी रूपयांचा निधी अंदाजपत्रकात ठेवण्यात आला आहे. काळुंद्रे, नवीन पनवेल, खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर असून पनवेल महापालिका हद्दीमध्ये हिरकणी माता-बाल संगोपन केंद्र-सर्व समावेशक ४५० बेडचे हॉस्पीटल उभारणीसाठी १७.५० कोटी, कळंबोली येथे ५० बेडचे हॉस्पोटल बांधण्यासाठी १० कोटी, महापालिका अग्निशमन विभागासाठी १ नग ॲडव्हान्स फायर इंजिन आणि १ नग ॲडव्हान्स इमरजन्सी रेस्क्यू टेंडर अशी २ वाहने तसेच टर्नटेबल लेंडर २२ मीटर, वाहन बॉडी बांधणी करण्यात येणार आहे. तसेच वॉटर बाऊझर वाहन खरेदीसाठी ७.३५ कोटी, अग्निशमन विभागासाठी ७० मीटर उंचीचे अरायल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच कामोठे येथे अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी १७ कोटी, भुयारी गटार आणि मलनिःसारण यासाठी १७८ कोटी, कामोठे मलनिःसारण केंद्रांतर्गत १५ दललि क्षमतेचे पाणी पुर्नवापर प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी ४० कोटी, ६.५ दललि क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणीसाठी २५.४९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

नवीन शाळा बांधकामासाठी ३४ कोटी, मनपा शाळांना शैक्षणिक सोयी-सुविधा, शिक्षक वेतन तसेच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीसाठी ८३ कोटी, रायगड जिल्हा परिषदने बांधलेल्या शाळा दुरुस्तीसाठी १०.७२ कोटींचा निधी अंदाजपत्रकात ठेवण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यापक जनहितार्थ मुलभूत उपाययोजना करणे यासाठी १०७ कोटी खर्च करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पनवेल महापालिकेला स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक मिळविण्याच्या हेतूने ४ प्रभागांसाठी मेगा स्विपिंग मशीन्ससाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच धूळ नियंत्रणाकरिता विविध उपाययोजनाकरण्यासाठी ११.३८ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

याप्रसंगी अतिरिवत आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक संचालक (नगररचना) केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे , लेखा अधिकारी  डॉ. संग्राम व्होरकाटे, उपमुख्य लेखापरीक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे, सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

उत्पन्न वाढीवर भर देणारा, आरोग्य सुविधांची वृध्दी करणारा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर करणारा, भविष्याचा दुरगामी विचार करुन नव्या जलस्त्रोतांचा शोध घेणारा, शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागावर भर देणारा, पर्यावरण संरक्षण-संवर्धन करणारा अर्थसंकल्प आहे.
-मंगेश चितळे, आयुक्त-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे