नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचा सन २०२४-२५ चा सुधारित आणि सन २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी मंजूर केला. मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे सादर केली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा आणि खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक १६८६.०६ कोटी रुपये तसेच जमा ३४०३.८२ कोटी रुपये अशी मिळून एकत्रित जमा ५०८९.८८ कोटी रुपये आणि ३७८८.८४ कोटी रुपये खर्चाचे सन २०२४-२५ चे सुधारित अंदाज तसेच १३०१.०४ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह ५७०९.९५ कोटी रुपये जमा आणि ५६८४.९५ कोटी खर्चाचे आणि २५ कोटी शिलकेचे नवी मुंबई महापालिकेचे सन २०२५-२६ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर आणि उपक्रमाचे मुख्य लेखा-वित्त अधिकारी तुषार दौंडकर यांनी आयुक्तांकडे सादर केल्यानंतर मंजूर करण्यात आले. तसेच नवी मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरण सचिव तथा उद्यान विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे आणि नयना ससाणे यांनी आयुक्तांकडे सादर केल्यानंतर तेही मंजूर करण्यात आले.
माझे शहर, माझा अभिमान मानणाऱ्या नवी मुंबई नागरिकांचा, नागरिकांकरिता असलेला सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करतांना मला अतिशय आनंद होत आहे.‘निश्चय केला - नंबर पहिला”हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपण या शहराला महाराष्ट्रात नंबर एक वर ठेवले आहे.तर केंद्र शासनाने भारतातल्या तीन सर्वात स्वच्छ शहरांचा ‘सुपर स्वच्छ लीग”हा विशेष गट करुन आपल्या शहराचा त्या गटात समावेश केला आहे.त्यामुळे हा बहुमान अभिमानाने टिकविण्याची आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.
महापालिकेच्या निवडणूका अद्याप होऊ शकल्या नाहीत, म्हणून प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले जात आहे. सर्व समाज घटकांचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे आवश्यक सर्व सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच लिखीत स्वरुपात नागरिकांचे प्रतिनिधीत्व अर्थसंकल्पात यावे यासाठी अभिप्राय, सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला आहे. त्यामधील बहुमूल्य सूचनांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
नवी मुंबई शहराला विकास केंद्र म्हणूनविकसित करण्यासोबतच उत्तम नागरी सेवा-सुविधायुक्त शहर विकसित करुन नागरिकांना उत्तम राहणीमान आणि आनंददायी रहिवास निर्माण करण्याबाबतचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शहर फक्त राहणे यापुरते मर्यादित न राहता ते एक विकास केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. नवी मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा कार्यान्वित होणार आहे. त्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यापार यामध्ये वाढ होणार आहे. त्याला पूरक अशा सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव ठेवत माझे शहर, माझा अभिमान मानणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचा, नागरिकांसाठी असलेला सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करताना अत्यानंद होत असल्याचे आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वित्तीय सुधारणा, विकास केंद्र-रोजगार निर्माण करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुलभ वाहतूक, आरोग्यव्यवस्थेचे बळकटीकरण, शाश्वत जल व्यवस्थापन, सुप्रशासन, माझी वसुंधरा-पर्यावरण, नियोजित शहर-पायाभूत सुविधेचा विकास या प्रमुख मथळ्यांखाली अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असेही आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्तांनी जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात ५७०९.९४ कोटी रुपये जमा अपेक्षित धरण्यात आले आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये जीएसटी करापोटी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान आणि मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर, नगररचना विभागामार्फत प्रापत होणारे शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता उपयोगिता, विविध सेवा आणि इतर साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नांचा समावेश आहे. यामध्ये शासन अनुदान (४०५.२५ कोटी), महापालिका जमा अंतर्गत वस्तू-सेवा कर अनुदान (१७५७ कोटी), मालमत्ता कर (१२०० कोटी), नगररचना शुल्क (३४३.५० कोटी), पाणीपट्टी-मोरबे (१५०.२० कोटी), गुंतवणुकीवरील व्याज (११२.५० कोटी), मुद्रांक शुल्क पोटी शासन अनुदान (९७.२० कोटी), स्थानिक संस्था कर (२५ कोटी), परवाना-जाहिरात शुल्क (५३.१३ कोटी), मलनिःस्सारण (१६.८४ कोटी), संकिर्ण जमा (२७९.४२ कोटी) आणि आरंभीची शिल्लक (१३०१.०३ कोटी) असा जमेचा रुपया अपेक्षित आहे.
तर खर्चाचा रुपयामध्ये एकूण ५६८४.९४ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. यामध्ये नागरी सुविधा (१०७९.७८ कोटी), प्रशासकीय सेवा (७७३.९१), पाणी पुरवठा-मलनिःस्सारण (५४४.७७ कोटी), इतर नागरी सुविधा (५०५.९० कोटी), ई-गव्हर्नन्स (६६.१९ कोटी), सामाजिक विकास (७०.०६ कोटी), घनकचरा व्यवस्थापन, क्षेपणभूमी, शौचालय (४७८.२२ कोटी), केंद्र-राज्य शासन पुरस्कृत योजना (५४४.३१ कोटी), आरोग्य सेवा (२६३.४८७ कोटी), परिवहन (२७० कोटी), आपत्ती निवारण, अग्निशमन (४७.७१ कोटी), शासकीय कर परतावा-इतर (३४४.९० कोटी), शिक्षण (१७९.२९ कोटी), अतिक्रमण (१६.३८ कोटी) तसेच राखीव निधी (५०० कोटी) या बाबींचा समावेश आहे.
आयुक्त तथा प्रशासक, या नात्याने एक स्वच्छ, सुंदर शहरापासून पुढे एक राहण्यायोग्य सर्वेात्तम दर्जाचे शहर साकारण्याचे स्वप्न घेऊन अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राला विकास केंद्र (Growth Hub) म्हणून उदयास आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नियोजन करीत आहे. त्या अनुषंगाने त्या विकासकेंद्राचा हिस्सा बनण्याची संधी आणि जबाबदारी आपल्यावर आहे. सदर बाब केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आलेली आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.