तुर्भे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वैद्यकीय शिबिराचे आयोजन
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अखंड हरीनाम सप्ताह २०२५ चे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. या निमित्ताने २२ फेब्रुवारी रोजी डॉ. रवींद्र गोसावी, सिद्धिविनायक केअर सेंटर व साई दृष्टी सुपर स्पेशालिस्ट आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग चिकित्सा व चष्मा मुक्ती शिबीर घेण्यात आले.
स्थानिक नागरिक, नवी मुंबई सफाई कामगार, महिला वर्ग, तसेच सप्ताह मध्ये आलेले शेकडो वारकरी यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात ईसीजी, रक्तातील साखर तपासणी, वजन आणि हायपर टेन्शन मॅनेजमेंट इत्यादी गोष्टींची शारीरिक तपासणी करून यावर नागरिकांना वैद्यकीय सल्ला, उपचार व मार्गदर्शन डॉ. रविंद्र गोसावी यांच्यातर्फे करण्यात आले. या शिबिरासाठी विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ व स्थानिक नागरिकांचे बहुमोल असे उत्स्फूर्तपणे सहकार्य लाभले.