नेरुळ जिमखान्याकडून स्त्री मुक्ती संघटनेला बेलर मशिन भेट
नवी मुंबई : नेरूळ जिमखाना ह्युमॅनिटेरियन विंगने आर आर रॉक अँड रिफ यांच्या देणगीतून स्त्रीमुक्ती संघटनेला बेलर मशीन भेट म्हणून दिले असून या बेलर मशीनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते हनुमान नगर तुर्भे येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नेरूळ जिमखानाच्या वतीने अनिल कर्था, शशी पांडे, डॉ शेरीफ, विनय राव, राम बिस्नोई, सौरभ भटनागर, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त सोमनाथ पोठेरे उपस्थित होते.
या बेलरच्या माध्यमातून एमएलपी म्हणजे मल्टीलेयर प्लास्टिकचे गट्टे बांधले जाणार असून कमी जागेत अधिक प्लास्टिक ठेवता येणार आहे. एमएलपी आज मोठ्या प्रमाणावर घराघरांतून तयार होत असून त्याचे योग्य नियोजन करून ते रिसायकलिंगसाठी जाणे हे पर्यावरणासाठी आवश्यक असल्याचे स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी सांगितले. या प्लास्टिकला किंमत नसल्याने ते मोठ्या प्रमाणावर डम्पिंगवर जाते; पण या उपक्रमातून जास्तीत जास्त एमएलपी विविध ठिकाणातून घेतली जाईल, या पर्यावरणपूरक कामातून कचरावेचक महिलांना रोजगारही मिळणार आहे असेही त्या म्हणाल्या. नेरूळ जिमखानाचे अनिल कर्था यांनी नेरूळ जिमखानाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समाजातील तळागाळातील महिला व मुलांना मदत करण्यासाठीची संस्था असून पर्यावरणावरही ही संस्था काम करते. सुनील पवार यांनी आपल्या भाषणात नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, कचरावेचक महिलांच्या कामामुळे ते शक्य झाले आहे, या महिला कचऱ्यात काम करून सर्वाचे आरोग्य चांगले राखायला मदत करतात, या कचरा वेचकांना आपण कचरावेचक आरोग्य सैनिक म्हणत असल्याचे सांगितले. जुन्या कपड्यातून नवीन उत्पादन करण्याचे युनिट महापालिकेच्या माध्यमातून बसवले जाणार असून त्यातूनही महिलांना रोजगार मिळणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. आशा गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रकल्पावरील कचरावेचक भगिनी कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.